पान:कार्यसंस्कृती.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आकांक्षा सर्व कामं पैशांनी होतात हा समज साफ चुकीचा आहे, म्हणजे चार पैसे पगारात वाढवले की माणसांना उत्साह येतो आणि मग ते दुप्पट गतीनं आणि ताकदीनं उतरतात हे खरं नाही. पैशानं माणसांची बांधिलकी, श्रद्धा आणि तडफ विकत घेता येत नाही. पैसा, पगार, मानधन लागतं खरं, पण ते म्हणजे सर्वस्व नाही. प्रेम असेल तर माणसं काहीही करतात, जीव टाकून काम करतात. माणसं त्यांच्या श्रद्धांसाठी, स्वप्नांसाठी, त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षांसाठी काहीही करतात. त्यांना हे माहीत असतं, की पैसा त्यांना खायला, प्यायला हवं ते पुरवतो, त्यांची हौसमौज भागवतो, पण पैसा मिळवण्यासाठी माणसं स्वतःचा जीव, स्वतःचं अस्तित्व पणाला लावतीलच असं नाही. मानवी इतिहासात आपण पाहिलं, की पैसा मिळावा म्हणून माणसं जीव देत नाहीत. माणसं जीव देतात स्वातंत्र्यासाठी, धर्मासाठी किंवा त्यांच्या स्वप्नासाठी. हेच सूत्र आपण कामाच्या ठिकाणी लावलं तर? आपण ज्यांच्याबरोबर काम करतो त्या माणसांच्या आशा, आकांक्षा, स्वप्नं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. आपल्या कामाच्या रचनेत त्यांच्या स्वप्नांना पूर्ण होण्याचा आपण किती अवकाश ठेवला आहे त्याकडं लक्ष द्यावं. माणसाच्या प्रेरणेचं मूळ त्याच्या आकांक्षांमध्ये आहे, पैशात नाही. १७ कार्यसंस्कृती