पान:कार्यसंस्कृती.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विकासाचा नकाशा एखादा संघ सतत विजय मिळवत राहतो आणि अजिंक्यपदाला पोहोचतो किंवा एखादी कंपनी सतत यशाच्या शिखरावर राहते तेव्हा तो विजय किंवा ते यश हे एका रात्रीत मिळवलेलं नसतं हे नक्की. प्रत्येक तासाला, दररोज, येणाऱ्या प्रत्येक आठवड्यात आणि दरवर्षी सातत्यानं चांगलंच काम करण्याचा जेव्हा आग्रह असतो, तेव्हाच असं नेत्रदीपक यश मिळत असतं. मात्र कामाच्या ठिकाणी असं अजिंक्यपद मिळवण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन असावं. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक खेळाडूच्या विकासाचा नकाशा बनवायला हवा. या एकूण वर्षात हा काय करणार, किती करणार आणि कुठे पोचणार याचा नेमकेपणा हवा. या वर्षातल्या नियोजनाप्रमाणे काय प्रगती होईल याची सविस्तर मांडणी केली जावी. अशा 'विकासाच्या नकाशा'मुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला आपण कुठे आहोत अन् आपल्याला कुठे पोचायचे आहे याची स्पष्ट कल्पना येईल. हा 'विकासाचा नकाशा' प्रत्येकाजवळ हवा. १९ कार्यसंस्कृती