पान:कार्यसंस्कृती.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चालक हवा, मालक नको सोसायटीची मीटिंग म्हणजे इतका काही कला असतो की काही म्हणजे काही विचारूच नका. प्रत्येक जण अक्षरश: अडेलतट्टूपणे आपापले मुद्दे घेऊन एकाकी लढत असतो. आग्रहानं भांडत असतो आणि चिडचिडत असतो. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारची रात्र म्हणजे म्हणूनच माझ्या अंगावर काटा येतो. या शनिवारी मात्र मला धक्का बसला. सकाळी सकाळी माझ्या फ्लॅटच्या दारातून एक छोटा कागद सरकवलेला होता. त्यात "आजच्या मीटिंगसाठी छोटं टिपण" असं लिहून खाली आमचे नवे सेक्रेटरी काटदरे यांनी सही केलेली होती. मला गंमत वाटली. मीटिंग सुरू झाली आणि मला धक्क्यावर धक्के बसत गेले. हसतमुख राहून काटदरे सर्वांना बोलायला लावत होते, कुणावरही ते टीकाटिप्पणी करत नव्हते किंवा स्वतःचं मत पुढ्यात मांडत नव्हते. त्यांचं काम मीटिंग चालवण्याचं होतं, मीटिंगवर मालकी गाजवण्याचं नव्हतं. माझ्या लक्षात आलं. जो 'मालक' असतो तो 'चालवत' नाही. मीटिंग चालवायला एक शांतपणा हवा, सर्वांना सोबत ठेवण्याचं कौशल्य हवं आणि एक अलिप्तपणा हवा. काटदऱ्यांकडे हे तीनही गुण होते आणि म्हणून गेल्या पाच वर्षांत झाली नाही इतकी सुंदर मीटिंग शनिवारी आमच्याकडे झाली. कार्यसंस्कृती । २०