पान:कार्यसंस्कृती.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनाशी शांत गप्पा उपनिषदांमध्ये एके ठिकाणी म्हटलं आहे, की आपल्या मनातला एखादा छोटा कोपरासुद्धा या अफाट विश्वाएवढा मोठा असतो. या विश्वाच्या आवाक्यात जितकं ज्ञान आहे तितकंच ज्ञान आपल्या मनाच्या खोल गाभाऱ्यात आहे. बाहेर अफाट धावाधाव करून जे मिळणार नाही, ते बऱ्याचदा शांतपणे एका जागी बसून आणि चिंतनात मश्गूल होऊन मिळू शकतं. कामाच्या धावपळीत म्हणूनच स्वतःसोबत संवाद करण्याचा वेळ हवा. दिवसाच्या धावपळीत किमान एकदा तरी मनाच्या खोल गाभाऱ्यात डोकावून पाहायला हवं. लोकल ट्रेननं ऑफिसला जाताना, दुपारचा डबा एकट्यानं खाताना, संध्याकाळी घरी येऊन गॅलरीत खुर्चीवर बसून कॉफीचा आस्वाद घेताना मनाशी शांतपणे गप्पा मारण्याची सवय लावून घ्यावी आणि मनाला प्रश्न विचारावेत- कसा गेला आजचा दिवस? आज मी कुठे चुकलो? का चुकलो? आणि उद्या मला कसं सुधारता येईल? नुसती तडतड करत धावाधाव करण्यापेक्षा मनाबरोबरची ही दहा मिनिटं आपल्याला खूप बळ देतील. २५ कार्यसंस्कृती