पान:कार्यसंस्कृती.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेरणेच्या तोंडी द्या प्रेरणाशक्ती हे एक अफाट प्रकरण आहे. प्रेरणा माणसाला कामाला लावते, ताकद देते आणि जीव ओतायला लावते. प्रेरणा नसेल तर पेट्रोल संपलेल्या गाडीसारखी आपली अवस्था होते. फक्त उतार असेल तर घरंगळत पुढे जाणारी, सपाट रस्त्यावर ढकललं तरच पुढे जाणारी आणि चढ असेल तर काहीच करू न शकणारी अशी पेट्रोलविना गाडी. आपण ज्यांच्या बरोबर काम करतो त्या सर्वांची प्रेरणा किती आहे आणि ती कुठून येते याचा आपल्याला नेमका अंदाज असणं आवश्यक आहे. काहींची प्रेरणा पैशाच्या अपेक्षेतून येते, काहींना मानमरातब हवा असतो, तर काहींना हवी असते सत्ता. आपल्याला याची स्पष्टता हवी हे मात्र नक्की. असेही काही जण असतात, की ज्यांना त्यांची प्रेरणा काय आणि कुठली हे नीट स्पष्ट नसतं. त्यांना त्याविषयी सांगून आणि बोलून 'प्रेरणेच्या तोंडी' देण्याची गरज असते. थोडा प्रयत्न केला तर तो त्याला हवं ते कसं मिळवू शकेल हे सांगणं आणि पटवणं आणि त्यानुसार त्याला काम करायला लावणं म्हणजे 'प्रेरणेच्या तोंडी देणं'. मात्र यासाठी त्या माणसाची संपूर्ण मानसिकता, मूळ स्वभाव अन् आकांक्षा यांची स्पष्ट जाण आपल्याला हवी. २७ कार्यसंस्कृती