पान:कार्यसंस्कृती.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढाऱ्यांचा फिटनेस हल्ली मी जेव्हा टेलिव्हिजन पाहतो तेव्हा तेव्हा एक गोष्ट मला जाणवते. आपले बहुतेक सर्व राजकीय पुढारी मला अत्यंत थकलेले आणि दमलेले दिसतात. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरची ही मंडळी इतक्या मोठ्या ओझ्याखाली आणि दमलेली दिसतात, की ही माणसं देशाच्या जनतेच्या हितासाठी काही ठोस आणि कणखर भूमिका घेऊ शकतील असं त्यांच्याकडे पाहून वाटतच नाही. चेहरा ओढलेला, डोळे आदल्या दिवशीच्या जागरणानं सुजलेले, खांदे पडलेले आणि संपूर्ण थकलेली देहबोली. एक गोष्ट साहजिक आहे. सततच्या प्रवासानं, धावपळीनं, अबरचबर खाण्यानं त्यांचं स्वास्थ्य पुढारी मंडळी घालवून बसतात. पण ज्यांच्या एका निर्णयानं हजारो, लाखो माणसांचं जीवन बदलणार असतं असे आपले नेते प्रफुल्लित, उत्साही, आनंदी आणि शांत नकोत? आपले मंत्री, आपले नेते जर असे थकलेले, तर मग जनता कशी असणार आहे? नेत्यांनी त्यांच्या 'फिटनेस'कडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं, त्यानं समाजही 'फिट' राहील. मानसिक आणि शारीरिक फिटनेस उत्तम कार्यसंस्कृतीसाठी अत्यावश्यक आहे. कार्यसंस्कृती २८