पान:कार्यसंस्कृती.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निश्चिंत तास माझ्या आर्किटेक्ट मित्रानं हल्लीच नवीन ऑफिस थाटलं. ऑफिसमध्ये फोन घेण्याच्या वेळा आम्हा सर्व मित्रांना सांगून टाकल्या. कामाचा वेळ हा फोनवर बोलण्यासाठी न वापरण्याबद्दल त्याची आम्ही टिंगलही केली. उत्सुकता म्हणून त्याच्या ऑफिसवर सकाळी दहा वाजताच मी थडकलो. त्याचं ऑफिस छोटंसंच आहे. तो, त्याचे दोन सहकारी, दोन व्यवस्थापकीय काम करणारे, आणि एक ऑफिसमध्ये काम करणारी मदतनीस, सातच जण. ऑफिसात सगळे शांतपणे, न बोलता काम करत बसलेले. मी काही विचारलं तर खुणेनं काही सांगत माझ्या मित्रानं मला जवळजवळ ऑफिसबाहेर काढलं. बाहेर आल्यावर तो म्हणाला, 'आमच्या कामात एकाग्र चित्तानं काम करण्याची फार गरज असते. सकाळचे तीन तास एकमेकांशी न बोलता शांतपणे आम्ही काम करतो. त्यामुळे भरपूर कामं पूर्ण होतात. आपल्याला कधीकधी उगाचच दुसऱ्याशी जाऊन बोलण्याची सवय असते. त्यामुळे छोट्याशा ऑफिसात सर्वांनाच त्रास होतो." मित्राच्या ऑफिसातल्या या निश्चिंत तासांची कल्पना मला फार आवडली. एकमेकांना काम करू देण्याची सवय चांगली वाटली. आपल्याला हे करून पाहता येईल. ऑफिसमध्येच काय, घरीसुद्धा जमू शकेल. त्यामुळे प्रत्येकाची कामाची वेळ आणि बोलण्याची वेळ निश्चित होऊन भरपूर काम होईल. २९ । कार्यसंस्कृती