पान:कार्यसंस्कृती.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झरोका कार्यक्षमता वाढावी म्हणून अनेक ठिकाणी निरनिराळे प्रयोग केले गेले. त्यात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे टेबल भिंतीकडे ठेवून काम करण्याची. त्यात तत्त्व असं आहे, की लिहिताना किंवा काम करताना एकाग्र चित्त असण्यासाठी समोर काही नको. भिंतीकडे पाठ ठेवून लिहीत बसलं तर खोलीत जे घडतं, कुणी येतं, त्याचा त्रास होऊन लक्ष विचलित होतं. माझ्या कार्यालयात मी तसा प्रयोग केला आणि काम अधिक चांगलं आणि कार्यक्षम होण्यासाठी त्याचा मला उपयोगही झाला. खोलीत कुणी आलं, कुणी नसलं तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नसे. सलग, शांतपणे, मी काम करू शकत असे. समोर एखादं पार्टिशन असण्यापेक्षा कुंडीतली झाडं किंवा एखादी फुलदाणीदेखील काम करताना अत्यंत सुखद अनुभव देते असं मी पाहिलं. तेव्हा माझ्या एका आर्किटेक्ट मित्रानं एक चांगली सूचना केली. तो म्हणाला, की नुसतं भिंतीकडे तोंड करून काम करण्यात अर्थ नाही. त्या भिंतीला एखादा झरोका किंवा खिडकीही हवी, ज्यातून झाडं दिसतील, मोकळं आकाश दिसेल, वारा येईल, मोकळा श्वास घेता येईल, ज्यातून तुला नव्या कल्पना सुचतील, मोकळा विचार करता येईल. मला ही कल्पना आवडली आणि गेली काही वर्षं मी त्याचा प्रयोग करतो आहे. जी नोंद ठेवली आहे, त्याप्रमाणे माझ्या कामातही मला फरक पडलेला स्पष्ट दिसतो आहे. ३३ । कार्यसंस्कृती