पान:कार्यसंस्कृती.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदर टवटवीत बाग प्रत्येक माणूस हा एक प्रचंड शक्तीचा स्रोत आहे यावर आपला पक्का विश्वास असायला हवा. काम करताना किंवा कामाची रचना करताना प्रत्येक माणूस उत्तमोत्तम काम कसं करेल यावर लक्ष हवं. प्रत्येक माणसाचा स्वभाव, त्याची आवड, त्याचा कल, त्या माणसाची ईर्षा, अभिलाषा, त्याची महत्त्वाकांक्षा या साऱ्या गोष्टींची अचूक जाण असायला हवी. कामाची रचना अशी असावी की काम करणारा प्रत्येक जण फुलेल, बहरेल आणि मोठा होईल. वाढण्यासाठी त्यांना वर मोकळी जागा असावी, खेळण्यासाठी आणि बागडण्यासाठी मुक्त अंगण असावं. आपण आपल्या रचना फार खुज्या करतो, संकुचित करतो. दगडी आणि कोरड्या करतो, आपल्या कामाची जागा आपण एखाद्या सुंदर बागेसारखी करत नाही तर निर्जीव आणि अडगळीची, अडचणीची, छोटी करतो. माणसाचा जीव शोषणारी, जीवनरस ओढून घेणारी. सुंदर आणि रम्य बागेसारखी कामाची जागा करणं ही गोष्ट अवघड आहे, पण अशक्य नाही. ते घडवायला मात्र हवं प्रेमळ, सर्जनशील कलाकाराचं मन. बाग फुलवणारं, मोठं करणारं. ३९ कार्यसंस्कृती