पान:कार्यसंस्कृती.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अप्रतिम गुणवत्तेसाठी आपल्या कामात आपण अप्रतिम गुणवत्ता कधी आणू शकतो? या अवघड प्रश्नाचं उत्तर स्वच्छ आहे. आपल्या मनात जेव्हा उदंड स्वप्न असतं आणि आपण एखादं छोटं काम अगदी मनापासून करत असतो, तेव्हा कामातील अप्रतिम गुणवत्ता साधता येते. ध्येय विशाल हवं आणि तेव्हाच पाय जमिनीवर हवेत, मोठं स्वप्न उराशी हवं; पण त्याच वेळेस त्याला उत्तम व्यवहारंवादाची आणि अपार कष्टांची जोड हवी. असं होईल तेव्हाच आपण गुणवत्ता मिळवू शकू. अस्सल कृती आणि व्यवहारवाद म्हणजे धाडस, आपल्या कष्टांवरची निष्ठा आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता. गप्पा मारून, स्वप्नं रंगवून, भाषण देऊन अन् बढाया मारून गुणवत्ता नाही मिळवता येत. जी परिस्थिती समोर येईल तिला सामोरं जाताना जेव्हा मनात उंच शिखर पक्कं असेल आणि कृतीवरची संपूर्ण निष्ठा असेल तेव्हा अप्रतिम गुणवत्ता जन्माला येईलच येईल, ४१ कार्यसंस्कृती