पान:कार्यसंस्कृती.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कामातील दक्षता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीचं ऑफिस असतं. संध्याकाळी आठपर्यंत तिकिटांच्या ऑर्डर्स येत असतात. सर्व टेबलांवर जोरदार काम सुरू असतं. अनेक कुपन्स देणं सुरू असतं. तिकिटांच्या रकमा गोळा होत असतात. अधिक वेग, अधिक वेग असा जोरदार प्रयत्न सर्व टेबलांवर चालू असतो. दुसऱ्या दिवशीच्या ऑर्डर्स गोळा झालेल्या असतात. घड्याळात साडेसात वाजलेले असतात. आता अर्धाच तास राहिला म्हणून सगळीकडे धावपळ चालू असते. आणि अचानक कॉम्प्युटर्स बंद पडतात. सगळं ठप्प. उद्याची तिकिटं कशी सोपवणार असा प्रश्न पडतो. बहुतेक सर्व कॉम्प्युटर्समध्ये 'सेव्ह' करण्याचं राहून गेलेलं असतं. त्यामुळे काय नेमकं सांगावं असा प्रश्न मॅनेजरला पडतो. चौकशी केल्यावर कळतं, गोंधळ बराच मोठा आहे आणि सुधारणा व्हायला बराच वेळ लागणार आहे. पुन्हा एकदा पहिल्यापासून शांतपणे सुरू करण्याची गरज असते. त्याशिवाय इलाज नसतो. मनात चलबिचल न होऊ देता जिथं आहोत तिथून सुरुवात करण्याची फार फार गरज असते. केव्हाही, काहीही अनपेक्षित गोष्ट समोर येईल आणि आपल्याला त्या गोष्टीला तोंड द्यायचं आहे हे मनात कायम पक्कं ठेवावं. एक संधी म्हणून, एक कसोटी म्हणून असे प्रसंग यावेत, सतत यावेत अशी अपेक्षा करावी. ५५ कार्यसंस्कृती