पान:कार्यसंस्कृती.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आतला गोट कितीही छोट्या किंवा कितीही मोठ्या कार्यालयात किंवा कंपनीत 'एक आतला गोट' असतो. अगदी छोट्या जाहिरात कंपनीत किंवा मोठ्या कामगार संघटनेत किंवा अगदी पंतप्रधान कार्यालयात सुद्धा 'आतला गोट' असतो. तो 'आतला गोट' सगळी सूत्रं हलवत असतो. दिशा ठरवत असतो. काय करायचं आणि काय करायचं नाही याची गणितं मांडत असतो. त्या संघटनेचा किंवा त्या कार्यालयाचा हा 'आतला गोट' म्हणजे प्राण असतो. श्वास असतो. ते एक शक्तिस्थळ असतं. हा 'आतला गोट' जितका एकरूप, जितका एकात्म, जितका बलवान, जितका एकसंध तितकी ती संघटना मोठी आणि व्यापक बनते. मात्र अशा 'आतल्या गोटा'ची प्रयत्नपूर्वक बांधणी करणं, तो जोपासणं आणि वाढवणं याला मात्र आपल्याकडे वेळ नसतो किंवा त्याची जाण नसते. हा 'आतला गोट' मग कमकुवत राहतो. विसविशीत बनतो, आणि उत्तुंग संघटना उभारायला कमी पडतो. असं झालं की मग आपण दोष देतो दैवाला, काळाला किंवा माणसांना. कार्यसंस्कृती ५६