पान:कार्यसंस्कृती.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कठोर सत्य पुष्कळ वेळा असं होतं की आपल्याला ऑफिसमध्ये चाललेली एखादी गोष्ट मुळीच पटत नसते. आपल्याला ही गोष्ट चुकीची होते आहे असं वाटत असतं; पण त्यावर कुणाशी बोलावं अशी परिस्थिती नसते किंवा संधी नसते. किंवा असं होतं, की त्या गटात किंवा कामाच्या त्या ठिकाणी अशा चुका काढण्याची पद्धत नसते. आपण बरं आणि आपलं टेबल, त्यावरचं काम बरं असंच सर्व जण करत असतो. मोकळं आणि शुद्ध टीका करण्याचं वातावरण नसल्याची काही कारणं असतात. एक म्हणजे तिथल्या नेते मंडळींना असं मोकळं बोलणं कितपत चालेल याविषयी सर्वांच्याच मनात शंका असते. दुसरं एक कारण असं असतं, की तिथल्या कुणालाच कामाविषयी काही फार घेणं नसतं, उत्तमाची आणि चांगल्याची विशेष आच नसते. तिसरं कारण असतं, की रचनाच अशी असते की एकमेकांच्या कामाविषयी एकमेकांना माहीतच नसतं. आणि त्यामुळे विशुद्ध टीका ती काय करणार? आणि चौथं कारण असं की तिथं कामाचा धबधबा असा असतो की कुणालाच काही बोलायला वेळ नसतो अन् तशी व्यवस्था नसते. आणि पाचवं कारण फार महत्त्वाचं आहे. आपल्यातल्या कित्येकांना कठोर सत्य बोला म्हटलं तरी त्यांना बोलणं जमत नाही. काहीही असो, कठोर सत्य बोलण्याचं मूल्य आपल्या . सर्वांना मोठं करतं यात शंका नाही. ५७८० कार्यसंस्कृती