पान:कार्यसंस्कृती.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकरूपता बसची वाट पाहात मी स्टॉपवर उभा होतो. थोड़ी संध्याकाळची वेळ होती. स्टॉपच्या समोरच्या बाजूला छोट्याशा झोपडीवर कौलं घालण्याचं काम तो करत होता. अत्यंत तन्मयतेनं, मन लावून एक एक कौल हातात घेऊन विलक्षण एकाग्रतेनं त्याचं काम चाललं होतं. आसपासची रहदारी, गोंगाट आणि थोडी चहलपहल याची त्याला काही म्हणजे काही तमा नव्हती. तो आणि त्याचं काम बस्स. दुसरं जगात काहीही नाही. तो, त्याचं शरीर, शरीरातली प्रत्येक पेशी संपूर्ण एकचित्तानं घरावर कौलं घालण्याचं काम करत होत्या. मला त्या माणसाची, त्यांच्या शांत चित्तानं मन लावून काम करण्याची विलक्षण म्हणजे विलक्षण कमाल वाटली. तो एक कार्यसंस्कृतीमधला योगी असावा असं मला वाटलं. . त्या उंचीवर ओणवं बसून एक एक कौल काढून लावण्याचं काम करताना तो बिलकूल अवघडलेला नव्हता. त्याच्या देहबोलीत कुठलीही अडचण नव्हती, जाणवतसुद्धा नव्हती. माणूस, त्याचं काम, आणि त्याचं इप्सित या गोष्टी एकरूप झाल्या की जी बहार येते ती मी पाहात होतो. ही एकरूपता कार्यसंस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे असंच मला वाटत राहिलं. ६९ । कार्यसंस्कृती