पान:कार्यसंस्कृती.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शांत मनाची ताकद रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन यांनी एके ठिकाणी म्हटलंय की शांत मन कधीही घाबरत नाही की गोंधळात पडत नाही. मग वेळ अगदी खडतर असो की विलक्षण उत्साहाची, मनाचा प्रवास चालूच असतो. जसं प्रचंड वादळात घड्याळ असतं ना, तसं. बाहेर कितीही मोठं वादळ घोंघावत असलं तरी घड्याळाचे काटे आपल्या गतीनं चालतच राहतात. काम करत असताना शांत मन असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. फार थोड्यांना ती कला जमते. खूप जणांना असं वाटतं की त्यांचं मन शांत असतं; पण तसं नसतं. आपण कामाला बसतो तेव्हा डोक्यात आदल्या दिवशीच्या रात्रीच्या जागरणामुळे निर्माण झालेला शीण असतो. सिग्नलशी त्या उद्दाम मोटारसायकलवाल्याशी झालेलं भांडणं असतं. दुपारी वसुधा येणार आहे मग तिला काय उत्तर देणार ही चिंता मनात असते. आणि आजसुद्धा घरी जाताना ट्रेनमध्ये तोच खूप बडबड करणारा ग्रुप असेल का याची भीती असते. हा सगळा गुंता डोक्यात ठेवून आपण काम सुरू करत असतो आणि मग कामाला हवा तसा, हवा तितका जोर पकडला जाऊ शकत नाही. त्यामुळे शांत मन ठेवून काम करण्याचा प्रयत्न अगदी जाणीवपूर्वक केला पाहिजे. ती खूप मोठी ताकद आहे हे लक्षात यायला लागेल. कार्यसंस्कृती ॥ ७४