पान:कार्यसंस्कृती.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A पैसा फेकणारी वृत्ती अनेक लोकांना पैसे देताना ते फेकण्याची सवय असते. काही दुकानं अशी आहेत की तिथले दुकानदार सुटे पैसे तुच्छतेनं काउंटरवर टाकतात. मी स्वतःसाठी एक नियम केला आहे, की ज्या दुकानात दुकानदार असे पैसे फेकतो त्या दुकानात किंवा हॉटेलात पुन्हा जायचं नाही. आपण असे पैसे का टाकतो? पैशाची आपल्याला काही किंमत नाही म्हणून? की लोकांना पैसे देणं हे आपल्याला नको वाटतं म्हणून? की लोकांना पैसे देताना त्यांच्या हाताला स्पर्श केला जाईल अशी आपल्याला भीती वाटते म्हणून? माझ्या गावातले मोठे दुकानदार पैसे असे तुच्छतेनं फेकताना मी पाहतो तेव्हा मला फार वाईट वाटतं. काही लोक पैशाला लक्ष्मी मानतात. त्या नोटांवर माझ्या देशाचं मानचिन्ह आहे म्हणून ते फेकून देऊ नये. या गोष्टीसोबतच पैसे फेकणाऱ्या त्या माणसाची जी उद्दाम प्रवृत्ती दिसते ना, ती तो माणूस स्वतःच्या कामाकडे आणि जगाकडे कसं पाहतो यावरूनही ठरते. जो माणूस समोरच्या माणसाचा आदर करत नाही, माझ्या देशाचं चिन्ह असलेल्या नोटा नीट सांभाळत नाही, तो माणूस काम चांगलं करत असेल यावर माझा विश्वास नाही. ७५ कार्यसंस्कृती