पान:कार्यसंस्कृती.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसऱ्यांच्या प्रेरणांची ओझी प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. प्राणी नैसर्गिक प्रेरणेवर कृती करतात. भूक लागली की शिकारीला बाहेर पडतात किंवा चारा खातात. माणसं तसं करत नाहीत. माणसांच्या समाजात काय करावं आणि काय करू नये याचे नीतिनियम ठरलेले असतात. त्यावर आपलं जगणं ठरवतात. अर्थात सध्या आणखी घोटाळा झालाय. माणसाला त्यानं काय केलं पाहिजे हे जसं कुणी सांगत नाही, तसं त्याला स्वतःला काय करावं हेदेखील सांगता येत नाही. बाबा म्हणतात म्हणून पमी डॉक्टर होते किंवा काका सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणून राजू जातो. इतर माणसं करतात म्हणून आपण त्या गोष्टी करतो आणि इतरांना आपण जे करावंसं वाटते ते आपण करतो. जंगलातला प्राणीसुद्धा वाटलं तर शिकार करतो नाही तर चक्क बसून राहतो. आपले पमी आणि राजू मात्र स्वतःची आतली प्रेरणा विसरतात. जे करावं असं आतून वाटत नाही ते दुसऱ्यांसाठी करायला जातात आणि आयुष्यभर कामाच्या ठिकाणी दुसऱ्याच्या प्रेरणांची ओझी वाहत राहतात. ऐकावं जनाचं पण करावं मात्र स्वतःच्या मनाचं हेच खरं. ७७ कार्यसंस्कृती.