पान:कार्यसंस्कृती.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 असुरक्षितता केव्हाही विमानात चढण्याच्या आधी एक विचित्र प्रकार बघायला मिळतो. तिकीट दाखवून झालेलं असतं. सीट निश्चित झालेली असते. सामान देऊन टाकलेले असतं आणि आपण विमान सुटण्याची घोषणा होण्याची वाट पाहात बसलेलो असतो. अचानक घोषणा होते आणि सर्वांची विमानापर्यंत पोचवणाऱ्या बसमध्ये बसण्याची खेचाखेच सुरू होते. मला समजतच नाही, सीट निश्चित आहे, विमान निश्चित आहे. ही बस नाही तर दुसरी बस असणारच आहे, मग आपली एवढी गडबड का? मला वाटतं, आपल्या मनात आत, खोलवर एक असुरक्षितता भरलेली आहे. एकूण व्यवस्थेवर आपला विश्वास नाही. केव्हाही काहीही घोटाळा होऊ शकतो असं उगाचच आपल्या मनात असतं आणि म्हणून आपण घाबरलेले असतो, आपल्याला असुरक्षित वाटत असतं. आपण निर्माण केलेल्या व्यवस्थांवर आपलाच विश्वास नसणं ही गोष्ट लाजिरवाणीच आहे. त्यातनंच आपल्या मनातली खोल असुरक्षितता जन्माला आली आहे. कार्यसंस्कृती ॥ ९२