पान:कार्यसंस्कृती.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आजचे सत्य सुजित आणि आशिष हे दोघे जवळचे मित्र: अनेक गोष्टी आणि आवडीनिवडी एकमेकांशी जुळणाऱ्या एका गोष्टीत मात्र विलक्षण फरक, सुजित हा पक्का भूतकाळाच्या, लहानपणाच्या आठवणीत रमणारा. शाळेतले मित्र, बालपण हे त्याचे आवडीचे विषय. आशिष स्वप्नाळू. भविष्यकाळात जगणारा. आपण काही दिवसांनी असं करू, तसं करू या कल्पनाविश्वात रमणारा. दोघांचंही आज कडे लक्ष नाही. दोघांनीही आयुष्यात फार काही केलं नाही. फार काही करून दाखवतील असं नाही, एक जण 'काल' मध्ये आणि एक जण फक्त 'उद्या' मध्ये रमणारा. त्यामुळे दोघांकडूनही 'आज' नाही. नवीन कृतीचा मागमूस दिसत नाही. खरं म्हणजे 'काल' आणि 'उद्या' यांना तसा काय अर्थ आहे? जे होत असतं ते 'आज' आहे म्हणून 'काल' आणि 'उद्या'ला अर्थ आहे. 'आज'चा दिवस महत्त्वाचा. आज आहे म्हणून सर्व आहे. स्वप्नांना आणि आठवणींना अर्थ आहे. 'आज' सत्य आहे. 'काल' आणि 'उद्या' हे भासच. ही जाणीव सर्व काळ असण्याची आज आवश्यकता वाटते.. ९७ कार्यसंस्कृती