या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

उत्पन्न झालेली भयप्रद पण चित्तवेधक वनश्री, यांतील प्रत्येक गोष्टींचे खरे रूप आह्मी रावळपिंडी वीस पंचवीस मैल मागे टाकून जसजसे पुढे जाऊ लागलों तसतसे आमच्या लक्षांत येऊ लागले. तसेच हा सर्व मार्ग पर्वतांच्या बाजूबाजूंनी काढलेला असल्यामुळे बहुतकरून प्रत्येक वळणाच्या ठिकाणी पर्वतांच्या शिखरांवरून लहान मोठे जलौघ वाहत येत असून ते खालच्या दऱ्यात जाऊन पडतात. आणि ते ओलांडून जाण्याकरितां त्यांजवरून मार्गावर . पूल बांधिलेले आहेत. याप्रमाणे मार्ग क्रमीत असतां डाव्या हातास अति उंच पर्वत व उजवे हातास तसेच अति खोल दरे व त्या पलीकडे त्याच पर्वतांची दुसरी रांग असून या दोन्ही रांगा एकमेकींस मिळाल्यासारख्या दुरून दिसत, यामुळे आतां हा मार्ग पुढे काढून व कसा काढिला असेल असा विचार करीत कांहीं काल रहावें तो अशाच अडचणींतून एके बाजूने रस्ता काढीलेल्या या दृष्टीस पडे. कोठे कोठे मागच्या दोहोंबाजंच्या उंच रांगा जात असून समोरून एक सुळका आडवा येऊन त्यांस मिळाल्यासारखा नेत्रास भास होऊन, अता मात्र हा मार्ग कुंठित होतो, असे वाटून तिकडेच नजर लावून बसावे तों वरीलप्रमाणे तेथेही कोणीकडून तरी मार्ग पुढे काढिलेला पाहून मनास मोठा अचंबा वाटे. जसजसे आह्मी पुढे जाऊ लागलों तसतसे एकाहून एक अधिकच उंच पर्वत व तसेच अगाध दरे पाहून आता ही उंची संपणार तरी कोठे, व आपला मार्ग जातां जाता किती उंचीवर जाणार, असा विचार मनांत घोळत असून हिमाचलाचे ते अत्यंत विशाल रूप पाहून आमचे मन