या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ मोरोपंतकृत स्ववत्समल भक्षिती परि न सर्वथा बाटती. ॥ ५८ १. (धेनूपक्षी) आपल्या वासराच्या शरीरावरील अथवा मूत्रादि अंतर्मळ. गाई आपल्या वासराचें आंग चाटून साफ करितात, तसेच त्या वासराचा मूत्रादिमल देखील खातात, त्यास अनुलक्षून हे वर्णन आहे. (कथापक्षी) आपल्या भक्तांचे पाप. येथें वत्स व मल हे दोन शब्द श्लिष्ट आहेत. २. अपवित्र होतात. जरि कथासुरभि (भगवत्कथाकामधेनु) स्ववत्समल (आपल्या भक्तांची पा) भक्षिति (नाहींशी करितात) तरि सर्वथा (कधीही) न बाटती (दूषित होत नाहींत). भगवंताची कथा श्रवण केल्याने श्रोत्यांची पापें लयास जातात. परंतु त्यामुळे ती कथा मात्र दूषित होत नाही. उलटपक्षीं, धेनु आपल्या वासरांचा मळ भक्षितात म्हणून त्यांची तोंडे तेवढी अपवित्र मानतात. येथे दुसऱ्या चरणांत तुल्ययोगिता अलंकार झाला आहे, कारण शिशु आणि जरठ यांच्या ठिकाणी कथासुरभिची वृत्ति तुल्य (समान) आहे असें वर्णिले आहे. 'नियतानां सकृद्धर्मः सा पुनस्तुल्ययोगिता' (साहित्यकौमुदी पृ० १५२,१९), यावर व्याख्यान:'औपम्यस्य गम्यत्वे पदार्थगतत्वेन प्रस्तुतानामप्रस्तुतानां वा समानधर्माभिसंबंधे तुल्ययोगिता' । (अलंकार-सर्वस्व पृ० ७०) 'प्रस्तुत वस्तूंचे जरि धर्मी एकत्व कथन कवि करिती । अथवा अप्रकृतांचें, बुध म्हणती तुल्ययोगिता तरि ती' ॥ १॥ हा चंद्र चकोरकुळे उल्हासवि तेंवि ती कुमुदमुकुलें । परि संकोचति कमलें तैशी व्यभिचारिणीमुखें विमलें ॥ २ ॥ त्वत्तनुची मृदुता जरि अनुभविली तरि गमे न कोणास । त्या मालतीशशिकलाकदलींचीही कठोरता खास' ॥३॥(अ. वि.) वर्णनीय (प्रस्तुत) अथवा अप्रस्तुत अशा पदार्थांचा जेव्हां गुणरूप अथवा क्रियारूप अशा एकाच धर्मावर अन्वय होतो तेथें तुल्ययोगिता अलंकार होतो. 'अहितहिती समवर्तन तरि दुसरी तुल्ययोगिता म्हणती । भूपा देसि सदा तूं शत्रुस मित्रासही पराभूती॥'(पराभूती=१ उत्कृष्ट संपत्ति, २ पराभव). वरील तुल्ययोगिता श्लेषमूलक आहे. याचे उदाहरण:-'जो वृक्षासि प्रतिपाळी । कां जो घाव घालीत मुळीं । दोहींसीही सममेळीं । पुष्पी फळी संतुष्ट' (एक. भाग ७,४०२) केका १८ पृ० ५२ यांतील ज्ञानेश्वरीच्या ओव्याही ह्याच अलंकारांची उदाहरणे होत. 'उत्तम गुणवंतासह वर्णिति समता करूनि तिसरीच । यम, वरुण, धनद, शक्रहि, तूंहि नृपा लोकपाल सम पांच ॥' येथे प्रस्तुत जो राजा त्याचे इंद्रादिकाशीं लोकपालत्वगुणास्तव साम्य दाखविले म्हणून हा तुल्ययोगितेचा तिसरा प्रकार. याचे उदाहरण:-'समागम मृगाक्षींचे चपलांचे विलासही। क्षणद्वय न राहाती घनारब्ध जरी स्वयें ॥' यांत निंदा गर्भित आहे. तुल्ययोगितेच्या या प्रकारास अन्यत्र 'सिद्धि' असेंही म्हटले आहे. तुल्ययोगितेची आणखी उदाहरणे:-१ 'चंद्रासि लागति कळा उपराग येतो । गंगेसि भंग बहु पाणउतार होतो । जे होय चूर्ण तरि मौक्तिक तें कशाला । नाहीं समान नलराजमहायशाला ॥ ॥ (रघुनाथपंडित) २ 'बहु लाजवीत होतों करिकेसरिकीरकेकिहरिणा मी। हांसत कम करावे भोगावें रडत तेंचि परिणामीं' (मोरोपंत-भारतीरामायण). बाटण्यास हेतु असून बाटणे हे कार्य झाले नाही म्हणून चतुर्थ चरणांत विशेषोक्ति अलंकार जाणावा. [केका ४ पृ० ११-१२ पहा.]