या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नांवाचे एक सुंदर काव्य भागवत प्रथम स्कंधाच्या आठव्या अध्यायाच्या आधाराने रचिलें असें त्यांतील उपसंहारात्मक श्लोकापासून दिसून येते. यावरून हेही काव्य ४५ वर्षांच्या आंतच झाले हे सिद्ध होते. तसेंच हरिवंश, मंत्रभागवत (१७८०-१७८८), अष्टोत्तरशत रामायण व केकावलि ही काव्ये त्यांनी उत्तरवयांत रचिली असावीत असें अंतःप्रमाणांवरून दिसते. पंतांनी मैराळ भाऊस लिहिलेल्या एका पत्रावरून १०८ रामायणांची सोमवती वाहण्याची त्यांची इच्छा स्पष्ट होते. यावरून त्यांनी एकंदर १०८ रामायणे रचिली असावीत हे खचित होते. पंतांच्या हातची अस्सल रामायणे प्रती करून घेण्याकरितां मैराळवावा अनवें गांवास जात असतांना त्यांस वाटेंत अंजिठ्याच्या घाटांत चोरांनी गाठले व त्यांच्याजवळील द्रव्य व रामायणांची दप्तरें हिसकावून घेऊन दप्तरें घाटाखाली फेकून दिली. बावांनी पुढे त्या दप्तरांचा पुष्कळ शोध केला पण त्यांस ती सांपडली नाहीत अशा रीतीने पंतांच्या अनुपलब्ध रामायणांची कायमची वाट लागल्याची गोष्ट सांगतात. मंत्रभागवतानंतर त्यांनी हरिवंश रचिला. आर्या केकावलीच्या काव्यसंग्रहांत सगळ्या ६१ गीती छापल्या असून पंतांच्या पोथींत त्या १७४ लिहिल्या आहेत. हे सुरस काव्य वाचून पंतांचे व्याही वावा पाध्ये यांनी पुढील मयूरकविवर्णनपर गीति रचिली ह्मणून सांगतातः ऐकुनि विश्व सुखावे ज्या केकीचा अपूर्व तो टाहो,। त्याला आयुष्याचा ईशकृपेनें कधीं न तोटा हो. ॥ पंत काव्यरचना फार जलद करित. ते एक्या बैठकीस १००-१५० आर्या रचित. दररोज रात्री धुळीची पाटी, संस्कृत पोथी, व सदीप समई एवढी तयारी चाकराने करून ठेवावी; नित्यकृत्य आटपल्यावर पंतांनी सर्व पाटीभर ग्रंथ लिहून मग झोंप घ्यावी. मग दुसरे दिवशी प्रातःकाळी पाटीवरील ग्रंथाची प्रत लक्ष्मणभट वाईकर याने करून ठेवावी असा त्यांचा नित्यक्रम होता. पंतांची काव्ये तयार होतांच ठिकठिकाणचे त्यांचे स्नेही त्यांच्या प्रती करून घेत. पंतांच्या काव्यांतून जागोजागी ठरीव यमकें आढळतात. त्यांविषयी असे सांगतात की बारामतीस पंत आपल्या खोलीत फावल्या वेळी सुचतील ती यमकें भिंतीवर लिहून ठेवीत. अशा रीतीने सर्व भिंतींवर यमकें लिहिलेली असत. त्यांपैकी काव्यरचना करितेवेळी त्यांना जी योग्य वाटत ती यमकें त्यांतून निवडून त्यांचा ते उपयोग करित. पंतांच्या वुद्धीस वर्षाकाली किंचित् मांद्य येत असल्यामुळे त्या वेळेस त्यांच्या हातून काव्यरचना कमी होई. पंतांनी भारतापैकी कर्णपर्व प्रथम रचून ते लोकांस आवडल्यामुळे नंतर समग्र भारतावर काव्यरचना केली. भारताच्या प्रत्येक पर्वाच्या पहिल्या गीतेचे प्रथमाक्षर घेतले असतां 'श्रीपांडवसहायो भगवानरविंदाक्षो जयति' असें संस्कृत वाक्य होते. सर्व पर्वांची माळ गुंफण्याच्या उद्देशाने प्रत्येक पर्वाच्या प्रथम गीतीची रचना करित करित पंत कर्णपर्वावर आले तेव्हां त्यांतील प्रथमगीतींत रचावयाचे आद्यक्षर 'भ' प्रथमच बिनचूक रचिले गेलेले पाहून त्यांना ईश्वरी प्रसादाचे कौतुक वाटले. पंतांची ग्रंथसंपत्ति फार मोठा आहे. त्याबद्दल विशेष माहिती 'परिशिष्ट-इ' त पहावी. गीति किंवा आर्या (हीं जरी वास्तविक भिन्न वृत्ते आहेत तरी पंत गीतीलाच आर्या ह्मणत) हे पंतांचे आवडते वृत्त