या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'केकावली'ची प्रस्तावना. रामघनमयूर म्हणे निववालचि सुरसिकासि केका हो! शंभुहि म्हणे न सेविति मंद म्हणुनि झुरसि काशिके ! कां हो! ॥ (वन. १३. १०८) ज्यांच्या वचनी, चित्तीं, कर्मी सर्वत्र कुशल भाव वसे, । या कृतिस तेचि गातिल सुकृती, वाल्मीकिकृतिस कुशलवसे. ॥ (स्वर्गारोहण./२.५७)' । महाराष्ट्रकविश्रेष्ठ मोरोपंत यांनी जी कित्येक उत्तमोत्तम काव्ये रचिली त्यांतील प्रमुखांत या 'केकावलि' काव्याची गणना आहे. त्यांच्या भारतभागवतरामायणादि काव्यांत त्यांनी. मूळ संस्कृतग्रंथांतील वर्णनाचा थोडा बहुत उपयोग केला असून कथानकसूत्र तर सर्वस्वी मुळांतलेच आहे. पण हे काव्य त्यांनी अगदी स्वतंत्र रीतीने निर्माण केले आहे. पंतांनी अगदी स्वतंत्रपणे अशी बरीच स्फुट प्रकरणे रचिलीं आहेत तरी त्या सर्वांत 'केकावली' च्या तोडीचे दुसरे काव्य नाही. यांत कवीच्या प्रतिभेचा अत्यंत उत्कर्ष झालेला आढळतो. हे काव्य स्तोत्ररूपी असून यांत कवीने खोद्धारार्थ 'दयामृतघन' परमेश्वराची अत्यंत सद्गदित अंतःकरणाने करुणा भाकिली आहे. 'भववनी त्रितापदवपावका ने कवि मयूराची तनु पोळली असल्यामुळे त्याने कारुण्यमेघ परमेश्वराजवळ स्वतापशमनार्थ जो करुणस्वराने टाहो फोडला त्यांत कवीच्या अंतःकरणांतील सर्व वृत्ति क्षुब्ध होऊन सर्व हृद्त विचार बाहेर पडले आहेत. याच गोष्टीमुळे हे छोटेसें काव्य इतके रमणीय झाले आहे. मोरोपंतांनी पुष्कळ काव्यरचना केली आहे ती न करितां त्यांनी जरी एवढेच काव्य निर्मिलें असतें तरी ते कवित्वसिंहासनावर आरूढ होऊन त्यांची कीर्ति अजरामर झाली असती. असले सर्वोत्कृष्ट काव्य रचण्यास कवीच्या मनावर संस्कार कोणचा झाला, व त्यांना कवित्वस्फूर्ति कोठून झाली, असा प्रश्न हे काव्य अंमळ लक्ष्यपूर्वक वाचले असतां वाचकांस सुचतो. ह्यांतील प्रतिपादित विषय, त्यांत निर्दिष्ट केलेल्या कथा, भक्तिरसाचा अस्खलित ओष इत्यादि गोष्टींचा सूक्ष्मपणे विचार करणारांस त्याचे उत्तर सहज देता येईल. पंतांनी आपल्या मोठमोठ्या काव्यांच्या आरंभी नमनरूपी जें मंगलाचरण केले आहे त्यावरून व्यास व वाल्मीक ह्या 'पुराण' कवींचा त्यांच्या बाकीच्या काव्यरचनेवरच नव्हे तर 'केकावली'वरही मोठाच संस्कार झाला असे दिसून येईल. ह्या काव्यांत रामायणभारतभागवतांतील कथांचा जो वारंवार उल्लेख केला आहे व व्यासाची जी स्तुति केली आहे त्यावरून ह्या म्हणण्यास विशेष बळकटी येते. तसेंच 'केकावलि' काय रचावयाच्या पूर्वी पंतांनी पंडित जगन्नाथरायाच्या काही 'लहरी'ही वाचल्या किंवा ऐकल्या असाव्यात असा त्यांतील विषयसाम्य व किंचित् विचारसाम्य यावरून काही जणांचा तर्क आहे. आता या काव्यांत भक्तिनदीचा जो महापूर गंभीर घोष करितांना