या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पु० १२] केरळकोकिळ. - ढेकूण. [अं० ६ कमले कमला शेते हरः शेते हिमालये। क्षीराब्धौ च हरिः शेते मन्ये मत्कुणशंकया ॥१॥ ढेकणाच्या प्रसादांतून सुटलेला असा मनुष्यप्राणी विरळाच आढळेल. ह्या प्राण्याचा प्रभाव–अर्थात् उपद्रव-फार प्राचीन कालापासून आहे असे दिसते. कारण, शिरोलेखांत लिहिलेला विनोदपर श्लोक तरी, त्या संस्कृत कवीने अनुभवावांचून लिहिलेला नाही, हे उघड आहे. कवीचा ध्वनितार्थ असा की, ह्या मत्कुणराजांना मनुष्य तर काय, पण देवसुद्धां भिऊन थरथर कांपतात! असा रात्रभर तळमळत ठेवणारा जो क्षुद्र जंतु, त्याचीही थोडीबहुत माहिती आपणांस असावी, ह्मणून सक्ष्मदर्शक यंत्रांतून दिसणारे त्याचे स्वरूप व आंडे ह्यांचे चित्र वर दिले आहे. व खाली त्याचे वर्णन देऊ. ढेकूण हा प्राणी अतिशय त्रासदायक व दंश करणारा आहे. हा गलिच्छ घरांत विशेषेकरून मोठमोठ्या शहरांत फार असतो. उष्ण प्रदेशांत तर ह्याची वस्ती दांडगी. बिछाने, लांकडाच्या व भिंतीच्या फटी, जुने कागदपत्र व ग्रंथ ही ह्याची राहण्याची आवडती स्थळे.

  • लक्ष्मी कमलामध्ये शयन करते; शंकर हिमालयावर निजतात; विष्णु क्षीराब्धीमध्ये शयन करतात. असें कां ? तर ढेकणाच्या भयामुळे !!