या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. rega लोकोत्तर चमत्कार को बुऱ्याची झाडे. THE - प्राणी आणि वनस्पति ह्यांची स्वरूपें व व्यापकता किती आहे, हे गहन विचाराशिवाय लक्ष्यांत यावयाचें नाही. आणि आले तरी तें इतकें अल्प येईल की, त्याची मर्यादा मानवी बुद्धीपलीकडे किती आहे, ह्याची कल्पना सुद्धां व्हावयाची नाही. गजापासून मशकापर्यंत प्राणी व कृमिकीटक आमच्या नजरेनें आह्मी पहातो. अत्यंत सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर, खरजेंतील अति सूक्ष्म जंतूही आमच्या डोळ्यांस दृश्य होतो. पण ज्याची कोणत्याही प्रकारे डोळ्यांस कल्पना होत नाही, असे लक्षावधि जीव सूक्ष्मदर्शक यंत्रांच्या सहायाने आपणांस हल्लीच्या काळी पहातां येतात. आणखी ह्याहून सुधारलेली सूक्ष्मदर्शक यंत्रे निघाली, तर ह्यांच्याहूनही सूक्ष्म असे लक्षावधि-किंवा कोट्यवधि जीवही कदाचित् मनुष्यमात्रास मिळतील. पण त्याच्याही पलीकडे अज्ञात असे अनंत रहाणारच ! तशीच गोष्ट वनस्पतींची आहे. सृष्टिक्रमाचा सूक्ष्म विचार केला तर असे दिसून येते की, सूक्ष्मापासून मनुष्याच्या अवस्थेप्रमाणेच हळूहळू स्थूळ पदार्थ बनले आहेत. अगदी लहान जीवापासून मोठा जीव, किंवा अत्यंत सूक्ष्म वनस्पतीपासून मोठा वृक्ष बनतो असें विचाराअंती दिसून येते. ह्मणजे बेडूक झाल्याबरोबर लागलाच हत्ती; किंवा कांगुणीचे झाड झाल्याबरोबर लागलाच वटवृक्ष असे झाले नसावें. तर आधी मासे; किंवा त्याहूनही सूक्ष्म जीव,-जसे कालवे वगैरे-नंतर बेडूक; बेडूक झाल्यावर कासवें; मग सुसरी; तदनंतर चतुष्पाद. आणि त्यानंतर तशाच क्रमाने हत्ती, मेमोथ वगैरे. वनस्पतीकोटीसही तोच नियम लागू. प्रथम शेवाळ; नंतर कमळे; नंतर पेरू; शिताफळी; नंतर मग आंबे, फणस, ताड, माड, किंवा वड, पिंपळ. असा किंवा अशाच प्रकारचा क्रम असला पाहिजे. अशाला बरीच प्रमाणे आढळतात. पण ती येथे सांगत बसण्याचे प्रयोजन नाही. ह्या लेखांत फक्त ज्या वनस्पति आपल्या नुसत्या नेत्रांस दिसत नाहीत, त्यांच्याविषयी काही थोडीबहुत माहिती सांगावयाची आहे.