या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. 'केसरी' व 'मराठा' पत्रांचे कर्ते, नामदार बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या काही लेखांवरून सरकारास मोठा संशय उत्पन्न होऊन बऱ्याच कालपर्यंत त्यांस कारागृहवास भोगावा लागला. त्या वेळी यच्चयावत् स्वदेशबांधवांसच नव्हे, तर वेदमूर्ति मोक्षमल्लर भट्टांसारख्या परकीयांस सुद्धां परम दुःख झाले. सारा महाराष्ट्रदेश हळहळला. परंतु सुदैवाने अनेक कारणे घडत घडत अखेर सरकारच्या मनांतील संशय दूर होत होत, त्याने सदय अंतःकरणाने परवां नुकतीच त्यांची मुक्तता केली. तेव्हां सर्व महाराष्ट्र देशांतच नव्हे तर आसेतुहिमाचल-आनदीआनंद झाला-किंवा नवाच दिपावलीचा सण झाला-अहेरांचे व देणग्याभेटींचे नामदारचरणीं ढीग पडले; शेकडो रुपयांच्या तारा खेळल्या; हजारों लोक दर्शनास आले; कथा काय, कीर्तने काय, सत्यनारायण काय, मेळे काय, भजने काय, सारी गर्दीच गर्दी. फटाके, दापोत्सव, पेढे, बर्फी ह्यांची तर मितीच नव्हती. गाडीवानांच्या गाड्या फुकट, दुकानदारांचे पेढे फुकट; फार तर काय, पण न्हाव्याची हजामत सुद्धां फुकट ह्मणून ऐकतो. हे सर्व प्रकार व सोहळे प्रत्यक्ष दर्शनाने व वर्तमानपत्रद्वारे सर्व विश्रुत झालेच आहेत. तथापि नामदारांच्या पुण्याईची सद्दी केप कन्याकुमारीपर्यंतही कशी जबरदस्त आहे, ह्याचा मासला कळावा ह्मणून आज आह्मी मलबारांतील-कोची येथील-लोकांनी तो आनंदोत्सव कशा काय थाटाने केला हे आनंदाने आमच्या वाचकास कळवीत आहों. आतां येवढे खरे की, महाराष्ट्रांतील उत्सवांपुढे ह्या उत्सवाची मोठी मातब्बरी आहे असे नाही. तथापि ही स्फूर्ति दूर अतरावरच्या-सहाशे मैलांवरच्या लोकांची आहे, हे ध्यानांत धरून विचार कला ह्मणजे हाही गौरव कमी योग्यतेचा आहे असें सहसा ह्मणवणार नाही. असो. कोचींतील उत्सव चार दिवस झाला. ह्यास्तव प्रत्येक दिवसाची हकीकत संक्षेपतः दिली असतां बरें पडेल. नामदारांची सुटका विशेष ध्यानी मनी नसतां, मंगळवारी रात्री १ ह्या मंगलाच्या योगाचा चमत्कार फार ध्यानात ठेवण्यासारखा आहे. केसरी पत्र प्रसिद्ध होतें मंगळवारी; यांड, आयर्टचे खून झाले मंगळवारी; ना० टिळकांस धरलें मंगळवारी; जामिनावर सुटले मंगळवारी; शिक्षा झाली मंगळवारी; आणि अखेर मक्तता झाली मंगळवारी. तेव्हां ह्या मंगलास मंगल ह्मणावें की अमंगल ह्मणावें !!