या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. 1. रा. रा. एडिटर 'केरळकोकिळ' यांस:सा. न. वि. वि. पत्र लिहिणेस कारण. आपण आपल्या 'केरळकोकिळ' मासिकपुस्तकांतून 'राजयोग' हा विषय देण्यास सुरू केलेला पाहून फार आनंद वाटतो. हा विषय किती चांगला आहे हे वर्णन करतां येत नाही. परंतु तो प्रत्येक अंकांतून येत गेल्यास फार चांगले होईल. महानुभव स्वामी विवेकानंद ह्यांनी आपल्या वक्तृत्वाने सर्व युरोप व अमेरिकाखंडही दुमदुमून टाकलें आहे. त्या त्यांच्या वाणीचा लाभ आपणांसही व्हावा, अशी इच्छा महाराष्ट्र वाचकांस होणे साहजिक आहे. करितां आपण त्यांच्या राजयोगावरील व्याख्यानाचें एकदम भाषांतर करून तें स्वतंत्र पुस्तक छापलें असतां, आपण आपल्या महाराष्ट्र बांधवांवर मोठेच उपकार केल्यासारखे होणार आहे. त्यास पुष्कळ ग्राहक मिळून आपल्या श्रमांचें साफल्य झाल्यावांचून राहणार नाही. इकडे त्याजबद्दल आगाऊ वर्गणीदार (१०) दहा असामी आहेत. आणि सर्वांच्या अनुमोदनाने हे कार्ड मी आपणांस लिहित आहे. तर याचा अवश्य विचार होईल अशी आशा करतो. कळावें, कृपालोभ पूर्ण असावा हे विनंती. सराफ गल्ली, शहापूर आपला एक उत्कर्षेच्छु, नवीन झालेला वर्गणीदार, (बेळगांव). यशवंत वासुदेव गुणाजी. रा. गुणाजी आदिकरून जसे दहा आगाऊ वर्गणीदार जमले, तसेच आणखी जमतील, तर त्यांच्या ह्मणण्याप्रमाणे स्वतंत्र भाषांतर लौकर छापून काढतां येण्यास काही हरकत नाही. ह्याकरितां ज्या ज्या वाचकांस हा विषय आवडला असेल, व तें पुस्तक घेण्याची इच्छा असेल, त्यांनी आपआपली नांवें मुंबई येथे के. कोकिळ आफिसांत कळविण्याची कृपा करावी. हणजे ताबडतोब विचार करता येईल. -ए० के० को० ता. सदरहू पत्रांत एक फारच तारिफ करण्यासारखी गोष्ट आहे. ती येथे आमच्या वाचकांसही कळविल्यावांचून रहावत नाही. ती गोष्ट ही की, वरील विस्तृत पत्र आधीं मुळी एका कार्डावर आहे. आणि त्यांतील बालबोध अक्षरें इतकी सुरेख, व्यवस्थित व वळणदार आहेत की, हे पत्र पुनःपुनः पहातच बसावेसे वाटते. शिवाय, त्यास तांबड्या शाईची बार्डर वगैरे घालून फारच सुशोभित केले आहे. पत्ता इंग्रजी लिहिला आहे. तो तर इतका मारू आहे की, बराच वेळपर्यंत ते रबरी टाइपच आहेत ह्मणून समजलों होतो. इतकें त्यांत कुशलत्व साधलें आहे,