या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १८९९, ह्मणा, की तशाच प्रकारची दोन द्वारे असतात. त्यातून तो देवमाशाप्रमाणे पाण्याचे फोवारे सोडतो. तो उन्हाळ्यांत मात्र दृष्टीस पडतो. आणि हवा स्वच्छ असते, तेव्हांच तो बाहेर पडतो. त्याचे अंग इतकें नाजूक असते की, यःकश्चित् वाऱ्याच्या झुळकीतही त्यास पाण्यामध्ये उभे राहतां येत नाही. समुद्रांतील इतर भयंकर व राक्षसी प्राण्यांप्रमाणेच हाही एक प्रचंड प्राणी असल्यामुळे, अनेक दर्यावर्दी लोकांनी त्याच्या अद्भुत शक्तीबद्दल व घाल्याबद्दल अनेक गोष्टी लिहून ठेविल्या आहेत. खलाशी लोक असे सांगतात की, उत्तर समुद्रामध्ये समुद्रसर्प गलबतास आडवा होऊन त्यास असा एक शेपटीचा जबर तडाका मारतो, की त्याबरोबर तें गलबत पालथें होते, आणि त्यांतील बुडालेल्या मनुष्यांवर तो यथेच्छ ताव मारतो. ते असेंही सांगतात की, तो समुद्रामध्ये निखालस ताठ उभा राहतो आणि आपले डोके जहाजावर घालून तेथें भक्ष्य शोधू लागतो. तेव्हां खलाशी लोकांची जी तिरपिट उडते ती काय सांगावी? नार्वेयन लोकांचा हा जरी येवढा मोठा जबरदस्त शत्रु आहे, तरी ते त्यास एका क्षणांत अगदी सोप्या युक्तीने पळवून लावतात ! ती युक्ति ही की, ह्या प्राण्याला वासाचा अतिशय तिटकारा आहे. ह्यास्तव त्यासाठी ते लोक आपल्यापाशी नेहेमीं कस्तुरी बाळगतात. समुद्रसपास कस्तुरीचा दर्प एक क्षणभरही सोसत नाही. तिचा जरा वास आला पुरे की केवढेही सर्पराज असले तरी पळत सुटलेच, किंवा त्यांनी पाण्यांत बुडी दिलीच ह्मणून समजावें !! हे समुद्रसर्प फक्त प्राचीन दर्यावर्दी लोकांनीच पाहिले होते असें नाहीं; तर आलीकडच्या दर्यावर्दी लोकांनीही त्यांविषयी पुष्कळ माहिती मिळविलेली आहे. आमिडी पिचाट ह्मणून एक मोठा नामांकित प्राणिशास्त्रवेत्ता होऊन गेला. त्याने "प्रचंड प्राणी" ह्या विषयावर एक मोठा सुंदर निबंध फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेला आहे. त्यामध्ये कांहीं चमत्कारिक पत्रे अस्सल बरहुकूम छापलेली आहेत. त्यांपैकी मासल्याकरतां ह्मणून प्रसंगानुसार एक दोन दाखल करतो. पहिल्यावर 'बर्गेन'च्या क्याप्टन फेरीचा सही आहे. ते पत्र असें: