या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९९. पत्रव्यवहार. श्री. एडिटरसाहेबःसाष्टांग नमस्कार. मी केरळकोकिळाचा वर्गणीदार आहे......आणखी थोडीशी विनंती आहे. जुलई १८९६ च्या अंकांत कळविले की, कोकिळावरील स्तुतिपर लेखांस स्थळसंकोचास्तव जागा देता येत नाही. आगष्ट ९६ च्या अंकांत मि. मुंबापुरस्थ दीक्षित यांचा स्तुतिपर पद्यलेख मोठ्या भिडेने दाखल करून असें कळविले की, "केरळकोकिळाचे स्तुतिपर लेख किंवा कविता आमच्या पुस्तकांत घण प्रशस्त नाही." पण ही आपली सूचना सर्वत्रांस पसंत होणार नाही. आपण स्तुतिप्रिय नाही, हा आपला हेतु आतां सर्वांस कळून चुकला आहे. पण हे अशा प्रकारचे लेख कोकिळाचे लिंबलोण आहे, ज्याला दृष्ट होईल किंवा जाहली आहे, त्याचीच ती काढली पाहिजे. एखाद्यास दृष्ट झाली तर त्याच्या ऐवजी दुसऱ्याची काढून गुण नाही, व मनाचे समाधानही नाही. करितां आपल्या पुस्तकावरील स्तुतिपर लेख त्यांतच खुलतील. दुसरे पुस्तकांत अगर वर्तमानपत्रांत तितके शोभणार नाहीत, व सर्वत्रांच्या वाचण्यांत येणार नाहीत. उद्या एखाद्या सभेचा अध्यक्ष हणेल की, माझे थ्यांक्स् येथे बोलू नका. दुसरी कोठे सभा एखाद्याच्या अध्यक्षतेखालीं भरेल तेथे बोला. तर ते कोणास रुचेल काय ? नाही. अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. विनंती हीच की, आपण कोकिळाच्या गौरवास अप्रिय होऊन वर्गणीदारांची निराशा करूं नका. गद्य राहू द्या. पण पद्यलेख तरी जरूर घेत जा. पद्यांतही जे खुबीदार रचलेले तेच घेत जा. तेही येतांच घेत जा, असाही कोणाचा हेका नाही. लेख आल्यावर पसंतीच्या क्रमानें तीन महिन्यांनी जरी प्रसिद्ध झाला तरी बेहेत्तर ! फार काही नाही. दर अंकांस या स्तुतिपर पद्यास एक पाठपोठ पान राखून ठेवले तरी आनंद आहे. पहा बुवा ! मला तर असे वाटते. इतक्यावर मर्जी आपली. आपला कोकिलअभिष्टचिंतक, त्र्यंबक रामचंद्र तामणे. कारकून, महालकचेरी, रावेर, ता. सावदें, जि. खानदेश.