या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. २४९ आहे. दुसऱ्याच्या अनुकरणांत नवीनत्व व रसाधिक्य नच साधेल, तर निदान त्याची बरोबरी तरी झाली पाहिजे. नाही तर, धवळ्याशेजारी पोवळा बांधल्याप्रमाणे त्याचे दोष अधिक ठळक दिसून उपहास्यतेला मात्र ती कृति अधिक पात्र होते. ईश्वरी प्रसादावर फारच थोड्यांची सत्ता चालते. पण मानवी कृतींतही ढळढळीत न्यूनत्व ठेवणे, साधारण नियमांतही डोळेझांक करणे, हे शुद्ध हेळसांडीचे व उताविळपणाचे लक्षण दिसते. मुखपृष्ठावर आपले नांव चमकण्यांत, आपली कृति मुद्रांकित होण्यांत, भाराभर पुस्तकांचा कर्तेपणा मिरविण्यांतच कांहीं मातब्बरी नाही, संगीत नाटकांचे मूळ उत्पादक किर्लोस्कर हे तर सर्वप्रसिद्धच आहेत. त्यांच्या नवीनत्वानें, कोमल पद्याने, व सुरस वाणीने आमचा सर्व महाराष्ट्र देश केवळ भुंगवत् गुंगत राहिला. त्यांतील शृंगारात्मक भागावर, व त्यांनी तरुण मंडळीस एक प्रकारची भुरळ घातली, व देशांतील पैशाचा फन्ना पाडला, तरुण उमेदवारांस भलताच कित्ता घालून दिला, इतक्याच सबबीवर कोणी कितीही जरी भडिमार केला, तरी त्यांच्या बहुतेक पद्यांत ईश्वरी प्रसाद आहे; उदात्त विचार भरलेले आहेत; अनेक प्रकारच्या अनुभवांनी मनोविकार जागृत करण्याची अद्भुत शक्ति आहे; मधुर व कोमल शब्दांनी अंत:करणास चटका लावण्याची त्यांत अप्रतिम करामत आहे; प्रसंगास अनुकूल अशा रागरागिणींच्या मनोहर रचनेने चित्तास तल्लीन करून टाकणारी मोहनी त्यांत भरली आहे. ह्या गोष्टी कोणासही नाकबूल करता यावयाच्या नाहीत. आणि ह्मणूनच काही दिवस शोकी मंडळींना ' संगीता शिवाय दुसरा विषय सुचेनासाच झाला. आणि योग्याची 'कुंडलिनी ' जागृत झाल्याप्रमाणे कितीएक मुग्ध कवींच्या कवित्वशक्तीला स्फुरण येऊन ती अगदी ओतूं आली. 'संगीत दिवाळी' 'संगीत नारळी पौर्णिमा' 'संगीत शिमगा' व 'संगीत हजामत' येथपर्यंत तिची मजल येऊन पोंचली ! अनुकरण करण्याची इच्छा ही मनुष्यमात्रामध्ये स्वाभाविकच असते. पण आमच्या मते महाराष्ट्र देशांत तर तिचा फारच फलफलाट आहे. एकानें शाई काढली, की दुसऱ्याची शाई तयार; एकानें दुकान धातले, की शेजारी तसलेच दुसरे आलेच. पुस्तकें, मासिक पुस्तकें, व वर्तमानपत्रे ह्यांची दशा तर काय विचारूच नये. केरळकोकिळ ' निघाला, की १. ' झाली ज्याची उपवर दुहिता । चैन नसे त्या तापवि चिंता ॥धृ. ॥' येवढें एकच पद जरी उदाहरणार्थ घेतले, तरी सुद्धा आमच्या ह्मणण्याची साक्ष पटेल. -