या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. २८७ मानवी स्वभाववैचित्र्याचे मनोरम प्रदर्शन आहे हटले, तर त्याहून विशेष शोभेल. ह्यांत जसे पुरुषांचे तसेच स्त्रियांचेही नानाविध चमत्कार दृष्टीस पडतात. अकबर, नासरुद्दीन, गवान, राजसिंहसारखे पुरुष व त्यांचे वर्तन ही ह्या बागेतील निर्मल सरोवरें होत. व महंमद तब्लख, औरंगजेब, गुलाम कादर हे सिंह, वाघ व लांडगे होत. पण ती आतां पेंढा भरलेली कलेवरें असल्यामुळे कर्मणुकीचा विषय होऊन बसली आहेत. नाही तर अशांच्या पुढे जाणार कोण ? काय ह्या नराधमांची कृत्ये! कोणी दहा लक्ष मनुष्यांचे शिरच्छेद केले ह्मणतो, तर कोणी कोटि मनुष्यांचे बळी घेतल्याचा डौल मारतो; कोणी मानवी शिरांचे मनोरे बांधतो, तर कोणी जनावरांप्रमाणे प्रजेखातर त्यांची शिकारच करतो; कोणी हजारों मनुष्यांवरून हत्ती चालवीत नेतो, तर कोणी त्यांस भिंतींतच चिनून टाकतो! कोणी सर्पदंश करवितो, तर कोणी कुत्र्याकडून फाडवितो; कोणी हत्तीखाली चिरडवितो, तर कोणी निःशस्त्र मनुष्याची वाघाबरोबर कुस्ती लावतो ! कोणी शत्रूला जिवंत सोलतो, तर कोणी मद्यप्राशनाला त्याच्या कवटीचा पेलाच करून शेखी मिरवितो! कोणी भावाचा जीव घेतो; तर कोणी बापाचा जीव घेतो. कोणी मुलीला विष देतो, तर कोणी मुलाला मातेच्या मांडीवरून ओढून त्याची आंतडी बाहेर काढतो. डोळे काढणे हे तर काय पांचवीला पूजलेलें! तो विधि उरकल्यावांचून जणों काय पान परतावयाला सुद्धा परवानगी नाही. अन्नांत विष; पोषाखांत विष; औषधांत विष; गोळ्यांत विष; पानसुपारीत विष !! हायहाय ! केवढी ही राजतृष्णा, आणि काय हा बलवत्तर धनलोभ! कनकासाठी जर हा प्रकार, तर कांतेविषयी काय विचारावें ? कोणी सुंदरीचा थुका झेलतो, तर कोणी खडेसाखरेच्या खड्याला सव्वालाख रुपये देतो. कोणी आरशांतील प्रतिबिंब पहाण्यासाठी आतुर होतो, तर कोणी प्रधानाच्या स्त्रीवरच जुलूम करतो. कोणी कन्येला मागणी घालतो, तर कोणी तुझीच बायको दे ह्मणतो; कोणी आपल्या कन्येवर डोळा ठेवतो, तर कोणी भावजयेबरोबर लग्नच लावून सोडतो. कोणी सुनेशी विवाह करण्याचे धर्मशास्त्र काढतो, तर कोणी सापत्न मातांना जनानखान्यांत दडपून यथेच्छ विलास भोगतो !! प्रभो रामचंद्रा ! हे पुण्यश्लोकाग्रणी निषधपते ! तुमच्याच पुत्रपौत्रांनी आपल्या सुकुमार कन्या शिखानष्टांस देऊन स्वकुल पवित्र करावें ना !! धिक्कार असो मानवीस्वभावाला, आणि त्याच्या सौख्यलोलुपतेला!