या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९८. मर्यादेच्या पलीकडे जात नाही, आणि त्या तर मर्यादेच्या बाहेरच्या असतात हेही खचित आहे. ह्या एवढ्याशा मर्यादेतील जे अद्भुत चमत्कार असतात, त्यांची कारणे, ह्या मर्यादेच्या बाहेरची असतात. विचार आणि बुद्धि त्यांच्यापर्यंत पोचत नाही. पण योगी ह्मणतो की, हे काहीच नाही. मन ह्याच्याही पेक्षा उच्चपदावर-श्रेष्ठ ज्ञानावर-जाऊ शकते. ह्या स्थितीला मन येऊन पोंचलें झणजे त्याला समाधि असें ह्मणतात. पूर्ण एकाग्रता-परमज्ञान-ह्यामध्ये मन हे विचारमर्यादेच्याही पलीकडे जाते. आणि ज्या गोष्टी विचाराने, किंवा उपजत बुद्धीनें कळणाच्या नव्हेत, त्या त्याच्यापुढे प्रत्यक्ष येऊन उभ्या राहतात. शरीरांतील सूक्ष्मशक्ती नीट रीतीनें उपयोगांत आणिल्या आणि प्राणांच्या निरनिराळ्या स्वरूपांना जर नीट वळण लावले, तर ती मनाला पुढे ढकलतात, आणि तें मग उच्च स्थानावर चढते, आणि तेथे शुद्ध ज्ञानास पोंचून तेथून सर्व कार्य करते. ह्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आपआपल्या कोटीशी अखंड संबंध असतो. बाह्यात्कारदृष्टया सारें ब्रह्मांड एकच आहे. आपल्यामध्ये आणि सू. यामध्ये काही भेद नाही. ह्याच्या उलट बोलले तर, शास्त्रज्ञ लोक त्याला काही तरी भाकड कथा ह्मणेल. तसेंच टेबल आणि मी, ह्यांच्या मध्येही खरोखर कांहीं भेद नाही. टेबल हा जडत्वाचा बिंदु आणि माझा देह हा दुसरा बिंदु आहे इतकेंच. हे सर्व आकार, जडतत्वांच्या अफाट समुद्रांतील भोंवऱ्याप्रमाणे दिसतात, आणि तसेच ते अस्थिर असतात. ज्याप्रमाणे एखाद्या नदीच्या प्रवाहांत लक्षावधि भोंवरे फिरत असावेत आणि तो प्रत्येक भोंवरा गर गर गर फिरून प्रतिक्षणी नवा बनतो, आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडतो व नवे पाण्याचे परमाणू आंत घुसतात, त्याप्रमाणे हे ब्रह्मांड प्रतिक्षणीं जडतत्वें बदलित असते. त्यांपैकीच आह्मी हे लहानसे भोवरे आहोत. जडतत्वांचा समुदाय आझांमध्ये शिरतो; गर गर गर फिरतो; थोडा काल मनुष्यदेहांत गिरकी खातो; आणि मग पुन्हा बदलून दुसऱ्याच आकाराने समजा पशू-फिरून खनिज पदार्थाच्या गोळ्याच्या रूपाने पुन्हा भोंवरा होतो. हा नित्याचाच फेरफार आहे. एकही शरीर शाश्वतचे नाही. शाश्वतची अशी कोणतीच वस्तु नाही. माझें शरीर, तुमचे शरीर हा सारा शाब्दिक प्रकार. हे फक्त जड पदार्थांचे एक एक गोळे आहेत. चंद्र, सूर्य, मनुष्य, पृथ्वी, वृक्ष, धातु हे सुद्धा एक एक गोळे होत, पण ह्यांतील एकही शाश्वतचे नव्हे. तर प्रत्येक पदार्थ बदलतो आहे. रूपांतर होते आहे. जड द्रव्याचा नेहमीं संयोग आणि पृथक्करण चालू असतें. १२