पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आर्थिकप्रश्न हा कौटुंबिक समस्यांचे मूळ -

 अज्ञान, अंधश्रद्धा, जुन्या परंपरा आणि आर्थिक हतबलता या मिश्रणातून ग्रामीण कुटुंबांमध्ये विविध प्रश्न निर्माण होताना दिसतात. इथल्या पुरुषांइतकीच किंबहुना काकणभर अधिकच स्त्रियांना रोजगाराची गरज आहे. कमी शिकलेल्या, गरीब कुटुंबातल्या अनेक विवाहित महिला ज्यांना काही ना काही कारणांनी टाकून दिलं आहे, माहेरी परत आल्या आहेत, त्यांना स्वत:च्या पायावर उभं रहाणं फार महत्त्वाचं आहे. यातल्या काहींना माहेरचा आधारही नसतो. काहींच्या वाट्याला माहेरी उपेक्षित जिणं येतं. पदरी कच्ची-बच्ची असतात. त्यांना वाढवण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी, समाजातल्या किमान सुरक्षिततेसाठी रोजगाराची संधी फार उपयोगी पडते. खरंतर अत्यावश्यक ठरते. त्याच्यामुळे मिळालेल्या आर्थिक उत्पन्नामुळे कुटुंबही लवकर स्थिर होते असे लक्षात येते.

 काम करण्याची तयारी व अपार जिद्द -

 शिक्षणाची संधी नाही. कच्चा माल, बाजारपेठ जवळ उपलब्ध नाही, हातात खेळतं भांडवल नाही. घरच्या शेतीत अनेक हिस्से, घरून पाठबळ नाही - एक ना दोन. अशी अनेक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक कारणं इथल्या माणसाला बहुधा परिस्थितीशी झुंजायला आणखी कणखर बनवतात. अशा अनेकविध अडचणी असताना ही माणसं कष्ट करायला सतत तयार असतात. नवीन शिकण्याची, आत्मसात करण्याची, आव्हान स्वीकारण्याची अफाट ताकद यांच्यात असते. मैलोन् मैल चालत येणं, ओझं वहाणं, दिवस-रात्र काम करणं या सगळ्याची तयारी दिसते.

 हे फक्त शारीरिक कष्ट असतात असंही नाही तर त्याबरोबर कौशल्य आत्मसात करण्याचं तंत्रही असतं. तानाजी आरुडे आणि निवृत्ती सुतार या दोन तरुणांनी बांबूतलं कौशल्य दाखवलंच आहे. तर यंत्रशाळेतून तंत्रशिक्षण घेतलेल्या सगळ्यांनीच तांत्रिक कसब जाणून घेतलं आहे. हे करत असताना प्रशिक्षणाचाही त्यांना चांगलाच उपयोग झाला आहे.

 प्रशिक्षण वर्गांची मदत -

 प्रस्तावनेनंतर दिलेल्या यादीकडे नजर टाकली तर किती विविध प्रकारचे प्रशिक्षणवर्ग गेल्या काही वर्षांत आयोजित केले गेले हे सहज लक्षात येतं. हे वर्ग आयोजित करत असताना त्यामागे विशिष्ट भूमिका होती, डोळस प्रयत्न होता. त्यातली पहिली भूमिका होती वेगवेगळं तंत्रज्ञान, कौशल्य गावापर्यंत पोहोचवण्याची. या वर्गांमध्ये कच्चा माल कसा असतो. कुठे मिळतो, किंमत किती या बाबींचाही समावेश असतो. त्याशिवाय वस्तू

जेथे उद्योजक, तेथे समृद्धी    ३७