पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आणखी एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे ज्या प्रमाणात सर्वांगीण प्रशिक्षण, शेवटपर्यंत मदत, मार्गदर्शन आवश्यक आहे त्याप्रमाणात ते उपलब्ध होतंच असं नाही. या मुलाखतीमध्ये अनेकांनी आणखी मार्गदर्शनाची, प्रशिक्षणवर्गाची अपेक्षा व्यक्त केली. धंदा चालू केल्यानंतरही काही काळ मदतीची गरज बोलून दाखवली. त्या दृष्टीने प्रबोधिनीमार्फत प्रयत्न चालू असतात. पण बरोबरीने आणखी कुणी यात मदत करू शकलं तर हा प्रयोग, ही धडपड अधिक प्रमाणात यशस्वी होऊ शकेल.

 सामाजिक देवाण-घेवाणीत वाढ -

 या उद्योगांनी ज्याप्रमाणे आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना उत्तर दिलं त्याचप्रमाणे काही नवीन सामाजिक बदल, नव्या सामाजिक जाणिवा निर्माण केल्या. त्यातून पुन्हा उद्योगांना मदत झालीच. गावातल्या महिलांचा परस्पर संपर्क वाढला. बचतगटांमुळे एकमेकींची नड समजायला लागली. त्यानुसार कर्ज वाटप सुरू झालं आणि भांडवलही मिळालं. शिवाय याच माध्यमातून उत्पादित मालाला गावातच गिऱ्हाईकही सापडलं. नड आहे म्हणून गटानं कर्ज द्यायचं तर कर्जफेड करता यावी म्हणून तिच्याकडून शक्यतो माल खरेदी करायचा असं हे दुहेरी तंत्र.

 कोणाची तरी मदत मला स्वत:च्या पायावर उभं रहायला उपयोगी पडली तशीच मी सुद्धा इतरांना मदत केली पाहिजे. असं वाटणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कुठलंच काम एखाद्याच्या प्रयत्नानं साध्य होत नाही. भागाचं आर्थिक चित्र पालटायचं असेल तर प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचं मार्गदर्शनाचं काम, त्या कामाचं महत्त्व समजून अशाच गावातल्या साऱ्या स्थानिक लोकांनी केलं पाहिजे तरच झालेले बदल रुजतील. ग्रामीण जीवन अधिक समृद्ध होईल.

 इतक्या वर्षाच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांना आता यश येताना दिसू लागलंय. अनेकांनी गावातला रोजगार वाढवला. अनेकांना नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. अशी 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' ही उक्ती इथे सार्थ होताना दिसते.

***


असाध्य ते साध्य करिता सायास.    ४१