पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८४ । केसरीची त्रिमूर्ति

 'विद्वत्त्व आणि कवित्व' या निबंधांत त्यांनी पुढीलप्रमाणे विधानें केलीं आहेत. व्याकरण, न्याय, मीमांसा इत्यादि शास्त्रे कवित्वास अपायकारक होत; कवीचें मन व तत्त्वज्ञानाचें मन स्वभावतः परस्परविरुद्ध होत; पहिल्याचा विषय कल्पना व दुसऱ्याचा विषय सत्यासत्य विवेचन. अप्रबुद्धतेच्या काळांत कल्पनाशक्ति जशी उद्दाम असते तशी पुढे कधीहि असत नाही. राष्ट्राच्या आद्य अवस्थेत उत्कृष्ट कविता उदय पावते. पुढे विचारशक्तीचें प्राबल्य होऊन कवित्वाचा ऱ्हास होतो.
अज्ञान व काव्य
 यांतला एकहि सिद्धान्त खरा नाही, हे आता जगाच्या इतिहासावरून स्पष्ट दिसत आहे. आज जगांतली बहुतेक सर्व राष्ट्रें प्रौढ अवस्थेला आलेली आहेत. तरीहि रवीन्द्रनाथ टागोर, व्हिक्टर ह्यूगो, टेनिसन, शरच्चंद्र, गटे, हरिभाऊ, मुनशी प्रेमचंद, महादेवी वर्मा, टॉलस्टॉय, गॉर्की यांसारखे कवि, कादंबरीकार, नाटककार उदयास येत आहेत. तेव्हा विद्वत्त्व आणि कवित्व यांचा मुळांत कांही विरोध आहे, हे खरें नाही. मागल्या काळाकडे पाहिलें तरी हेंच दिसेल. वाल्मीकि, व्यास, कालिदास हे विद्वानहि होते आणि कविहि होते. त्यांचा काळहि अज्ञानावस्थेचा नव्हता. सर्व प्रकारचीं शास्त्रे तेव्हा उदयास आली होती व समाज चांगला प्रौढ झाला होता. तर्काच्या दृष्टीने पाहिलें तरी वरील सिद्धान्त चुकीचाच ठरतो. कवीला कल्पना सुचतात त्या अज्ञानामुळे सुचतात, हें जें गृहीत धरलेलें आहे तेंच चुकीचें आहे. नदी, चंद्र, कमल, स्त्री, हरिणशावकें, यांविषयीचे संपूर्ण शास्त्रीय ज्ञान कालिदासाला होतें. तरी त्यांवर त्याने रम्य कल्पना केल्या. कवीला साम्य दिसतें म्हणून तो तशी कल्पना करतो. तिच्याशीं अज्ञानाचा कांही संबंध नाही. तेव्हा काव्याला समाजाची व व्यक्तीची अज्ञानावस्था कारण असते, हा सिद्धान्त अगदी निर्मूल होय.
निराळी उपपत्ति
 स्वत: विष्णुशास्त्री यांनीहि याच्या अगदी विरुद्ध नव्हे, पण अगदी निराळी अशी काव्यनिर्मितीची उपपत्ति 'इंग्लिश कविता' या आपल्या निबंधांत मांडली आहे. शेक्सपियर, मिल्टन या कवींच्या काळीं इंग्लंड चांगले प्रौढ दशेस आलें होतें. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तर ती प्रौढता अगदी परिपक्व झाली होती. तरी त्या काळांत शेक्सपीयर, बायरन् वर्डस्वर्थं, शेली, कीट्स, असे कवि झाले. हे कां झाले? विष्णुशास्त्री म्हणतात, "ज्या काळी मोठाल्या लढाया, राज्यक्रांति, वगैरे लौकिक महत्त्वाच्या गोष्टी घडून येतात व राष्ट्रचें राष्ट्र जसें काय खळबळून जातें, त्याच संधीस वक्तृत्व, कविता, इतिहास इत्यादिकांचा उदय होतो, असा अलीकडील इतिहासकारांनी एक सिद्धान्त काढला आहे, आणि या महासिद्धान्ताचा प्रत्यय आज अनेक वेळा घडून आला आहे." हें सांगून शास्त्रीबुवांनी, पुढे याचीं अनेक उदाहरणें दिली आहेत. तेव्हा कवित्वाच्या उदयास अज्ञानावस्था लागते, विद्वत्तेचा,