पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टीकाकार विष्णुशास्त्री । ८५

विचारशक्तीचा व तिचा विरोध असतो, हा सिद्धान्त विष्णुशास्त्री यांना स्वतःलाच तितकासा मान्य होता, असें दिसत नाही.
उपयोग काय?
 आता राहिलेल्या एका मुद्दयाचा विचार करून 'टीकाकार विष्णुशास्त्री' हें प्रकरण संपवू. 'संस्कृत कविपंचक' या पुस्तकाच्या उपोद्घातांत विष्णुशास्त्री यांनी म्हटले आहे की, संस्कृत कवींविषयीचें आम्ही जें निरूपण करणार त्याचा उपयोग काय, असें कोणी विचारतील. हाच प्रश्न त्यांनी 'इतिहास' या निबंधाच्या प्रारंभीं व जॉनसनच्या चरित्राच्या प्रारंभी उपस्थित केला आहे. याचा उपयोग काय? इतिहासाचा उपयोग काय? चरित्राचा उपयोग काय? काव्य-सौंदर्य-समीक्षणाचा उपयोग काय? आपल्या समाजाला त्या काळी किती जडता, मूढता आली होती तें यावरून कळून येईल. असले प्रश्न आज कोणाच्या स्वप्नांतहि येत नाहीत. कोणीं तसे विचारलेंच तर त्याचें हसूं होईल. एवढें मानसिक परिवर्तन गेल्या शंभर-सव्वाश वर्षांत घडून आले आहे. ज्या थोर पुरुषांच्या प्रयत्नाने हें परिवर्तन घडून आलें. त्यांतच विष्णुशास्त्री यांची गणना होते. हें परिवर्तन घडविणें हेंच त्यांचे जीवितकार्य होतें.
 प्रस्तुतचा प्रश्न असा आहे की, संस्कृत कवींच्या काव्याच्या समीक्षणाचा उपयोग काय? असे प्रश्न विचारणाऱ्यांना विष्णुशास्त्री प्रथम अगदी हेटाळून टाकतात. ते म्हणतात, "सुवासिक पुष्पांचा वास घेऊन काय करावयाचें आहे, सुंदर युवतींच्या लीला पाहण्यांत काय अर्थ आहे, हे प्रश्न कोणत्याहि मनुष्याच्या तोंडून प्रायः येणार नाहीत व आलेच तर त्या धन्य पुरुषाच्या ठायीं ब्रह्मदेवाने आपली कर्तबगारी कांही विशेष रीतीने ओतली आहे, अशी कल्पना करणें प्राप्त होतें. इतिहासाविषयी असा प्रश्न विचारणारा मनुष्य कल्पनेचा जड ठरून वृद्धप्रमदान्यायाने उपहास्य होतो, असेंच त्यांनी त्या निबंधांत म्हटले आहे. तेव्हा असा प्रश्न विचारणारांचा त्यांना अतिशय तिरस्कार वाटे, हें उघड दिसतें. पण उपहास केल्यानंतर त्यांनी जीं उत्तरे दिलीं आहेत तीं आपल्या दृष्टीने लक्षणीय आहेत. कारण लेखणीचा प्रपंच करून त्यांना काय साधावयाचें होतें तें त्यावरून स्पष्ट होतें.
राष्ट्र व भाषा
 संस्कृत-काव्यविवेचनाचा उपयोग काय या प्रश्नाला त्यांचें उत्तर असें : प्रस्तुत विषयाच्या निरूपणाचे पहिले मुख्य कारण त्याचें रमणीयत्व; पण या उपयोगाचें ज्यांस महत्त्व वाटत नाही त्यांना इतकेंच सांगतों की, या विषयापासून आपल्या लोकांस वरील मुख्य उपयोगाखेरीज दुसरेहि दोन मोठे उपयोग होणारे आहेत. ते एक राष्ट्राच्या संबंधाने व एक देशभाषेच्या संबंधाने असे आहेत.
 विष्णुशास्त्री यांच्या सर्व लेखनामागे, सर्व उद्योगांमागे या दोन महत्त्वाच्या प्रेरणा होत्या. राष्ट्र व देशभाषा! त्यांनी साहित्य-समीक्षण केलें त्यांत अर्थातच सौंदर्य-दर्शन हा मुख्य हेतु होता; पण तो समीक्षणे लिहीत असतांनाहि, त्यांचें वरील