पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९० । केसरीची त्रिमूर्ति

बहुजनांपर्यंत ती क्रांति पोचवावी हा विष्णुशास्त्री यांचा उद्देश होता. म्हणूनच त्यांनी जॉनसन हा विषय निवडून त्याचें चरित्र अगदी अर्वाचीन पद्धतीने लिहिलें. त्यांत इंग्लंडची राजकीय, सामाजिक सर्व प्रकारची स्थिति त्या काळीं कशी होती याचें तपशीलवार वर्णन त्यांनी केलें आहे. इंग्लंडमध्ये राजकीय पक्ष कोणते होते, राजाचें स्थान काय होतें, लोकांचें स्वातंत्र्यप्रेम कसें प्रखर होतें, अमेरिकेत क्रांति झाली तिच्यामागे प्रेरणा कोणत्या होत्या हें सर्व त्यांनी विवरून सांगितलें आहे; आणि या संदर्भात जॉनसनची राजकीय तत्त्वप्रणालि कोणती होती याची चर्चा केली आहे. अशा तऱ्हेची चर्चा पूर्वीच्या काळच्या चरित्रांत केव्हाहि आढळावयाची नाही.
बॉसवेल आदर्श
 परिस्थितीमुळे जशी व्यक्तीची घडण होते तशीच तिच्या भोवतालचे जे आप्त, मित्र, सुहृद, यांच्यामुळेहि होत असते, हें जाणून विष्णुशास्त्री यांनी गॅरिक, साव्हेज व बॉसवेल यांचीहि माहिती प्रसंगाने दिली आहे. गॅरिक हा प्रख्यात नट तर डॉ. जानसनचा शिष्यच होता. शेक्सपियरचीं मागे पडलेली नाटकें त्याने रंगभूमीवर आणली आणि त्या राष्ट्राच्या महाकवीविषयी सर्वांच्या ठायीं पुन्हा अतिशय प्रेम उत्पन्न करून लोकाभिरुचीस नवेंच वळण लावलें. लोकाभिरुचीस नवें वळण लावणें हें शास्त्रीबुवांचें उद्दिष्ट होतें हें वर अनेक ठिकाणी सांगितलें आहे. तसें असल्यामुळे तें कार्य करणाऱ्या लोकांचें त्यांना मोठें कौतुक असे व त्यांचा ते आवर्जून उल्लेख करतात. जॉनसनच्या आधी, आडिसनने लोकाभिरुचीस नवें वळण लावलें, जॉनसनने लोकांस विचार करावयास शिकविलें, बॉसवेलने जॉनसनचें चरित्र लिहून अपूर्व ग्रंथपद्धति सुरू केली, असें कौतुक निबंधमालेत अनेक ठिकाणी दृष्टीस पडतें. विष्णुशास्त्री यांनी आपले ध्येय निश्चित केलें तें या अशा लोकांच्या ग्रंथांच्या अभ्यासामुळेच केलें, हें यावरून स्पष्ट दिसतें. बॉसवेलने जॉनसनचें जें चरित्र लिहिलें त्याचें त्यांनी जें वर्णन केलें आहे त्यावरून तो आदर्श पुढे ठेवूनच त्यांनी जॉनसनचे चरित्र लिहिलें असावें याविषयी शंका राहत नाही. बॉसवेलच्या चरित्राचे मुख्य गुण कोणते? निःसीम सत्यभक्ति, मनुष्यस्वभावाचें ज्ञान आणि त्यांत मुख्य नायक, त्याचें मंडळ व त्याचा अवघा काळ यांचे आलेलें प्रतिबिंब. शास्त्रीबुवा म्हणतात तसा प्रकार इतरत्र कोठेहि नाही. त्याच्या ग्रंथाची लोकमान्यता अद्याप पहिल्यासारखी असल्याचें बीज तेंच होय.
मित्रपरिवार
 साव्हेज हा जॉनसनचा परम मित्र. दोघेहि समानशील. ते दोघे रात्रीचे बाहेर पडून पहाटेपर्यंत रस्त्याने भटकत असत; आणि भटकतांना काय करीत? जगाच्या उलाढाली! अनेक राजांना ते पदच्युत करीत, नव्या राज्यपद्धति प्रस्थापित करीत, युरोपातल्या सर्व राष्ट्रांना नवे कायदे करून देत आणि जगाची नाना प्रकारांनी