पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९६ । केसरीची त्रिमूर्ति

 अशी निबंधरचना भारतांत गेल्या शतकांत पाश्चात्त्य विद्या येथे आल्यानंतरच सुरू झाली. त्याआधी प्राचीन काळी, संस्कृतांत किंवा नंतर प्रांतिक भाषांत कांही किरकोळ अपवाद वजा जातां येथे कोणीहि, केव्हाहि अशी रचना केली नव्हती. पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर महाराष्ट्रांत बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी इत्यादि पंडित भौतिक दृष्टीने समाजाच्या उत्कर्षापकर्षाचा विचार करूं लागले, व समाजाच्या बुद्धीला स्वतःचे सिद्धान्त पटवून देण्याच्या हेतूने लेखन करूं लागले. यांतूनच निबंध ही नवी ग्रंथ-पद्धति निर्माण झाली. विष्णुशास्त्री यांनी आपल्या अभ्यासाने व भाषाप्रभुवाने तिलाच परिणत रूप प्राप्त करून दिलें, तें परिणत रूप म्हणजेच निबंधमाला होय.
 विष्णुशास्त्री यांना स्वदेशाच्या उत्कर्षापकर्षाची मीमांसा करावयाची होती. आपल्या प्राचीन परंपरेच्या गुणदोषांची चर्चा करावयाची होती. इंग्रजी राज्यामुळे हिंदुस्थानाला लाभ कोणते झाले व त्याची हानि किती झाली ते ठरवावयाचें होतें. त्यांच्या आधीच्या पंडितांनी मांडलेल्या सिद्धान्तांचें परीक्षण करून त्यांतील ग्राह्याग्राह्य पाहवयाचें होतें. आणि यावरून स्व-समाजाला कांही मार्गदर्शन करावयाचें होतें. त्यांनी निबंध किंवा ग्रंथ रचले ते याच हेतूने. (वक्तृत्व, इंग्रेजी भाषा, मोरोपंताची कविता, आमच्या देशाची स्थिति- हे त्यांचे लहान लहान ग्रंथच आहेत.) नव्या विद्वानांनी ग्रंथ-रचना करावी हा त्यांचा आग्रह असल्यामुळे त्यांनी प्रथम तशी रचना करून त्यांच्यापुढे आदर्श निर्माण करून ठेविले. ती आदर्श रचना कशी आहे तें आता पाहावयाचें आहे. ही पाहणी जरा सूक्ष्मपणें व चिकित्सेने करणें अवश्य आहे. कारण हिंदुस्थानच्या सर्व इतिहासांत प्राकृत भाषेत केलेली ही पहिलीच निबंध-रचना आहे. वर सांगितलेच आहे की, इंग्रजांपूर्वी येथे कोणत्याच भाषेत निबंध-रचना नव्हती. त्यांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर अव्वल इंग्रजीत जे पंडित झाले त्यांनी निबंध-रचना केली, पण ती इंग्रजींतून. मराठींत जांभेकर, लोकहितवादी यांनी निबंध लिहिले. त्यांचा आशय मोठा असला तरी ती रचना प्राथमिक स्वरूपाची होती. तिला प्रौढ, परिणत रूप दिलें तें विष्णुशास्त्री यांनी. म्हणून तिची चिकित्सा बारकाईनें होणें अवश्य आहे.
 एखादी वास्तु किंवा एखादें मंदिर बांधावयाचें ठरलें की प्रथम त्या वास्तूचा सर्व नकाशा काढतात. मजले किती, प्रत्येक मजल्यावर दालनें किती, जिने कोठे, दारें कोठे, गच्ची कोठे अशी सर्व आखणी आधी करतात. आणि सर्वांना प्रथम वास्तूच्या स्वरूपाची स्पष्ट कल्पना देतात. निबंध-रचनेंत प्रारंभी हेंच करावें लागतें. विष्णुशास्त्री यांनी प्रत्येक निबंधांत ही दक्षता घेतली आहे. 'संपत्तीचा उपभोग' हा निबंध पाहा. आरंभींच या निबंधांत कशाचें प्रतिपादन होणार आहे, तें त्यांनी सांगितलें आहे. प्राचीन काळी बहुतेक सर्व देशांत संपत्तीला तुच्छ लेखीत असत. अर्वाचीन काळीं याच्या उलट मतें सर्वत झाली आहेत. तेव्हा हीं मतें कितपत