पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चरित्र - रूपरेषा । १२५

प्रवेश केला. प्रारंभापासून आगरकर केसरीचे संपादक होते. ते पद त्यांनी १८८७ पर्यंत संभाळले.
 वृत्तपत्र-संपादकाचें पद म्हणजे काटेरी मुकुट आहे हें या तरुण पत्रकारांच्या लवकरच ध्यानांत आलें. कोल्हापूर संस्थानचे दिवाण बर्वे यांनी तेथले दत्तक राजे शिवाजीमहाराज यांचा छळ चालविला आहे, अशा वार्ता केसरीकर्त्यांच्या कानीं आल्या. केसरीने त्याविषयी कांहीं पत्रें प्रसिद्ध केलों व लेखहि लिहिले. मराठ्यांतहि कांही लेख आले. तेव्हा बर्वे यांनी केसरीचे संपादक आगरकर व मराठाचें संपादक टिळक यांच्यांवर अब्रूनुकसानीची फिर्याद केली. त्यांच्या बाजूचे साक्षीदार आयत्या वेळीं फिरले. बर्वे यांच्यावरचा आरोप कोर्टात सिद्ध झाला नाही, आणि दोघां संपादकांना १०१ दिवसांची शिक्षा झाली. 'डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे एकशेएक दिवस' या पुस्तकांत आगरकरांनी या तुरुंगवासाचें वर्णन केले आहे.
 हा खटला चालू असतांनाच १८८२ च्या मार्चमध्ये विष्णुशास्त्री कालवश झाले होते; त्यामुळे या नव्या मंडळींचा मूलाधारचं निखळून पडला होता; पण हे दोघेहि पुरुष स्वयंप्रभ होते. त्यामुळे मुळीच न डगमगतां त्यांनी सुटून आल्यावर राष्ट्रकार्याची धुरा पुन्हा खांद्यावर घेतली.
 न्यू इंग्लिश स्कूलचा जम बसल्यावर दोन-तीन वर्षांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी शाळेच्या चालकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि १८८५ सालीं २ जानेवारी रोजी फर्ग्युसन कॉलेज सुरू केलें. बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे, म. शि. गोळे, वा. बा. केळकर, म. ब. नामजोशी, ना. कृ. धारप हे सोसायटीचे संस्थापक व आजीव सभासद होते. वा. शि. आपटे हे कॉलेजचे पहिले प्राचार्य झाले.
 प्रारंभी टिळक व आगरकर यांच्यांत मतभेद नव्हते; पण १८८४ च्या सुमारास ते सुरू झाले. बालविवाह, असंमत वैधव्य या दुष्ट रूढिं कायद्याने बंद कराव्या की नाही, सरकारला आपल्या धर्मांत हस्तक्षेप करूं द्यावा की नाही, या व असल्या प्रश्नांवरून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सभासदांत तीव्र मतभेद होऊं लागले. यामुळे १८८७ साली डे. ए. सोसायटी व केसरी-मराठा हीं वृत्तपत्रे यांचा संबंध तोडून टाकण्यांत आला आणि टिळक, वा. बा. केळकर व ह. ना. गोखले हे छापखाना व वृत्तपत्रे यांचे संयुक्त मालक झाले. तेव्हापासून केसरीत सामाजिक सुधारणांच्या बाबतींत आगरकरांच्या मतांविरुद्ध लेख येऊ लागले. त्यामुळे त्यांनी केसरीचें संपादकपद सोडून दिलें आणि पुढल्या वर्षी १८८८ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर 'सुधारक' हें पत्र काढलें.
 पण डेक्कन एज्युकेशन सोसायटींतील भांडणे एवढ्याने मिटली नाहीत. प्रारंभी निर्वाहापुरतें वेतन सर्वांनी घ्यावें असें ठरलें होते; पण पुढे सांपत्तिक स्थितीप्रमाणे वेतन घ्यावें असें आगरकरांनी सुचविलें. तें टिळकांना पसंत पडले नाही.