पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२६ । केसरीची त्रिमूर्ति

इंदूरच्या महाराजांनी दिलेल्या देणगीवरून असाच वाद निर्माण झाला व तो विकोपाला गेला. इतरहि अनेक कारणें झालीं व शेवटीं १८९० साली टिळकांनी सोसायटी सोडली.
 आगरकर सोसायटींत शेवटपर्यंत राहिले. १८९२ साली प्राचार्य वामनराव आपटे मृत्यु पावले. तेव्हा त्यांच्या जागीं आगरकरांची नेमणूक झाली. 'सुधारक' पत्रहि आगरकर नेटाने व उत्साहाने चालवीत होते. आता केसरी व सुधारक या दोन्ही पत्रांचे संसार स्वतंत्र झाले होते, तरी त्यांच्यांतील भांडणें मिटली नाहीत. प्रारंभी त्यांच्यांतील मतभेद केवळ तात्त्विक होते, पण पुढे एकमेकांविषयी टिळक व आगरकर या थोर पुरुषांचीं मतें कलुषित झाली. एकमेकांच्या सद्भावनेविषयीहि त्यांना शंका येऊ लागल्या. त्यामुळे त्यांच्यांतील वाद अगदी विकोपाला गेला व निंदा- प्रतिनिंदा यांना सीमा राहिली नाही.
 फर्ग्युसनचा कारभार आगरकरांनी उत्तम चालविला होता; पण हळूहळू त्यांचा दम्याचा विकार बळावला. तरुणपणांत त्यांना अनंत हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. पुढे दारिद्र्य कांही अंशीं गेलें; पण समाजसुधारणेचा पक्ष त्यांनी उचलल्यामुळे त्यांना लोकनिंदा फार सोसावी लागली. त्यांच्या हयातीतच लोकांनी त्यांची प्रेतयात्रा काढली होती. या सर्वांचा परिणाम होऊन १८९५ साली आगरकर कालवश झाले.
 टिळकांनी केसरींत आगरकरांच्यावर मृत्युलेख लिहिला त्यांत आगरकरांच्या मनोनिग्रह, स्वार्थत्याग, धैर्य, इत्यादि गुणांचा गौरव करून पुढे म्हटलें आहे की, "दुःखाची अगर संकटांची भीति न बाळगतां जो आपल्या ठायीं असणाऱ्या या सद्गुणांचा लोकसेवेसाठी उपयोग करतो तोच मोठा म्हणावयाचा. गोपाळराव आगरकर हे त्या कोटींतले होते."
 अशा या थोर पुरुषाचें– या अर्वाचीन दधीचीचें- कार्य आता आपल्याला अभ्यासावयाचें आहे. वर सांगितलेंच की, बी. ए. ची पदवी मिळाली तेव्हाच या पुरुषाने आईला लिहून टाकलें होतें की, "मी आपले जीवन देशाला अर्पण करणार आहे." आता दोन वर्षांनी बुद्धि, प्रज्ञा, अर्पण-वृत्ति, राष्ट्रनिष्ठा, धैर्य, दृढनिश्चय या साधनांनी समद्ध होऊन तो पुरुष हिंदुस्थानाकडे पाहूं लागला तेव्हा त्याला तो कसा दिसला तें प्रथम पाहूं.