पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला ? । १३३

पतित मानून ते त्याच्यावर बहिष्कार टाकीत असत. मात्र त्याने प्रायश्चित्त घेऊन ब्राह्मणांना दक्षिणा दिली की झाला तो शुद्ध व अन्नोदक-व्यवहारास योग्य. रूढ आचारांत चूक झाली की धर्म बुडतो, पण नीति बिघडली तर मात्र धर्म बुडत नाही; अशी त्यांची घातक समजूत होती. मनुस्मृतीसारख्या शास्त्रग्रंथांत त्या समजुतीला आधार नाही; पण तें कोण बघतो! शास्त्रात् रूढिर्बलीयसी!
 असें असले तरी, इंग्रजांच्या राज्यांत परिस्थिति इतकी बदलली व दैनंदिन जीवनावर तिचा एवढा प्रभाव पडला की, पूर्वीचे नित्याचे कर्मठपणाचे अनेक आचारधर्म नियमितपणें पाळणे कठीण वाटू लागलें, सरकारी नोकरी संभाळतांना त्यांची अडचण होऊं लागली आणि बरेच लोक त्यांकडे दुर्लक्ष करूं लागले. साहेबाशी व त्याच्या शूद्र नोकरांशी सहवास व शेकहॅड घडायचा; आगगाडींतून प्रवास करतांना वाटेल त्या जातीचे लोक शेजारीं येऊन बसायचे; त्यांचा विटाळ टाळायचा कसा, व तो घालविण्यासाठी स्नान तरी कितीदा करायचें? डॉक्टरांचे औषध घ्यायलाच पाहिजे, मग त्यांतले निषिद्ध पदार्थ पोटांत गेले तर काय करणार! काम-धंद्यासाठी प्रवास केलाच पाहिजे; त्या घाई-गर्दीत स्नान-संध्येचा नेम कसा पाळणार! इंग्रजी शिक्षणामुळे सुशिक्षित लोकांची श्रद्धा थोडी तरी कमी झाली होतीच. त्यांचा आचारधर्म जरासा शिथिल होणें साहजिक होतें; आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली वृद्ध माणसें त्यांना जाब विचारूं शकत नव्हती. त्यांची सत्ता गरीब अबलांवर व मुलाबाळांवर तेवढी चालायची. कांही दांभिक लोक जाणूनबुजून ब्राह्मणधर्माचें उल्लंघन करीत होते, दुराचार करीत होते; पण त्यांना वाळीत टाकण्याचें कोणी मनांतहि आणीत नव्हतें. तांबोळ्याकडचा ओला चुना, हलवायाकडची मिठाई यांमुळे दोष लागतो हें कोणाच्या ध्यानांतच येत नव्हतें. सनातनी लोकहि निष्ठेने आचारधर्म पाळीत नव्हते. 'ग्रामण्य- प्रकरण' या निबंधांत आगरकर याविषयी म्हणतात, "नवीन तऱ्हेचें शिक्षण लोकांस मिळू लागल्यामुळे तरुण पिढीच्या मनांत नवीन धर्मकल्पना आणि नवीन आचार यांचा उदय होऊं लागला आहे. इतकेंच नाही, तर या कल्पनांचा आणि या आचारांचा परिणाम जुन्या लोकांवरहि अप्रत्यक्ष रीतीने त्यांस न कळत होत आहे; आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध व समाजाविरुद्ध ते सुधारक बनत आहेत."
 सुधारणेला विरोध करणाऱ्या सनातनी धर्ममार्तंडांबद्दल आगरकर लिहितात की, आज जे धर्माभिमानी थाटले आहेत, ते खऱ्या खऱ्या धर्मरक्षण बुद्धीने पुढे आले आहेत, असें नाही. तसें असतें तर चालू धर्मसमजुतींविरुद्ध हजारो गोष्टी त्यांच्या डोळ्यांपुढे घडत असून व कित्येक तर खुद्द त्यांच्या घरांत शिरल्या असून तिकडे ते जी डोळेझाक करतात ती त्यांनी कधीच केली नसती.
 अशा प्रकारे जुना आचारधर्म हळूहळू शिथिल होत चालला होता; पण आगरकरांना त्या कर्मकांडात्मक धर्माचा केवढा उबग आला होता तें त्यांच्या पुढील उदगारांवरून स्पष्ट समजतें- हे अमंगळ हिंदु धर्मा, जबरदस्त पंचाक्षऱ्याप्रमाणे