पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला? । १३५

साठी! निराधार विधवेकडे पाहून परपुरुषाची कामवासना जागृत होणार व त्याचें पाऊल वाकडें पडणार. 'शहाण्यांचा मूर्खपणा' या वर उल्लेखिलेल्या लेखांत आगरकरांनी या कल्पनेवर फार कडक टीका केली आहे. ते म्हणतात, "गतभर्तृकांची कृत्रिम कुरूपता राष्ट्राच्या नीत्युन्नतीस अवश्य आहे असें ज्यांचें मत असेल ते त्यांचें वपनच करून कां थांबतात कोण जाणे! त्यांचे हातपाय तोडावे, डोळे काढावे, नाके कापावीं, त्यांना कांही खाऊ न घालतां कोंडून घालाव्या म्हणजे त्यांचे कामविकार प्रबल होणार नाहीत व त्यांना कोणाशी संबंध ठेवतां येणार नाही. किंबहुना त्यांना अफूच्या गोळया किंवा सोमलाच्या पुड्या देण्याचा प्रघात पाडला तर त्यांच्या हातून अनीति घडण्याचा मुळीच संभव नाही."
 "बालविवाहाची चाल हें स्त्रीच्या दुर्दशेचें एक प्रमुख कारण आहे. स्त्री व पुरुष वयांत आल्यानंतरच त्यांचें मीलन घडावें, असा सृष्टीचा नियम आहे. त्याचें उल्लंघन झालें तर समाजावर त्याचे घातक परिणाम होतात. हिंदु समाजांत बालविवाहाची चाल शेकडो वर्षे रूढ असल्यामुळेच आमची प्रजा क्षीण, अल्पायुषी, नादान, उत्साहशून्य व भेकड अशी होत आहे. आमचें मानसिक सामर्थ्यहि नाहीसें होत आहे," असें आगरकरांचें मत आहे. बालविवाह बंद झाल्यास बालविधवा होणार नाहीत, पुरुषांच्या अंगीं अधिक पौरुष दिसूं लागेल, असें ते म्हणतात. स्त्री-पुरुषांच्या सुखासाठी त्यांनी स्वयंवराचा पुरस्कार केला आहे. त्यांच्या मतें स्वयंवर नाही तो बालविवाहच होय. हिंदु समाजांत पूर्वी स्वयंवराची चाल होती, तरुणपणीं विवाह होत असत; पण पुढे ते बंद होऊन बालविवाह सुरू झाला. तो इतका पराकोटीला गेला की, मुलें जन्माला येण्यापूर्वीच त्यांचें लग्न कांही लोक ठरवूं लागले, आणि लहान अर्भकांचींहि लग्नें करूं लागले. ऋतुप्राप्तीपूर्वीच मुलीचें लग्न केलें पाहिजे, नाही तर पितर नरकांत जातात, असें धर्मशास्त्र सांगतें. त्यामुळे ज्यांना कामविकार अजून माहीत नाही अशा मुला-मुलींचा लग्नसोहळा उरकून त्यांना रात्नीं शृंगारलेल्या खोलीत कोंडायचें व त्यांनी रतिसुख भोगावें अशी अपेक्षा करावयाची, अशी सर्वांना घाई झालेली असे. स्त्री-पुरुषांच्या रतिसुखाचा भंडवडा व मातेरें करण्याची अधिक मूर्खपणाची रीत कल्पनीय असेल काय, असें आगरकरांनी म्हटलें आहे. तारुण्याने मुसमुसलेल्या, कामाने व प्रणयरंगामुळे धुंद झालेल्या, संगमोत्सुक स्त्री-पुरुषांच्या मीलनाची बहार व अल्पवयी, अजाण मुला-मुलींना बळजोरीनें एकत्र कोंडण्याचा अत्याचार यांची तुलना करून, आगरकरांनी बालविवाहाचा निषेध केला आहे.
 बालविवाहांत लहान मुलीचें कित्येकदा वयस्क किंवा जख्खड म्हाताऱ्या पुरुषाशींहि लग्न केलें जातें. कारण विवाहाच्या बाबतींत पुरुषांवर कसलेंच बंधन नाही. अशा विजोड विवाहामुळे कामांध पुरुष कधी कधी आपल्या अल्पवयी स्त्रीवर अत्याचार करण्यासहि मागेपुढे पाहत नाहीत. बंगालमध्ये हरिमोहन याने तसलें दुष्ट कृत्य केलें. त्यांत ती मुलगी मेल्यामुळे, तें उघडकीस आलें.