पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३८ । केसरीची त्रिमूर्ति

व्हावें हें इष्ट आहे," असें आगरकरांनी म्हटलें आहे. चंद्रगुप्तापासून रावबाजीपर्यंत हिंदूंनी कांहीच पराक्रम केला नाही, असें आगरकर म्हणत नाहीत; पण त्यांच्या मतें तो इतका अल्प आहे की, त्यामुळे आमच्या ऐतिहासिक शून्यतेस बाध येतो असें त्यांस वाटत नाही.
 आज भारताच्या प्राचीन इतिहासाचें जें संशोधन झाले आहे त्याअन्वये पाहतां इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाला आगरकरांचे हे उद्गार लागू पडतील असें नाही. सातवाहन, गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य, पाल, वर्धन, भोज, पल्लव, कदंब इत्यादि अनेक महापराक्रमी राजघराणीं या भूमींत होऊन गेलीं व त्यांनी सतत हजार-दीड हजार वर्षे परकीय आक्रमकांचे निर्दाळण करून या भूमीच्या वैभवांत सर्वांगांनी भर घातली, असें इतिहास सांगत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहा सोनेरी पानें या ग्रंथांत हा सर्व इतिहास दिला आहे; पण एक तर असे महापुरुष या भूमींत होऊनहि आम्ही त्यांचे पराक्रम विसरून गेलों आणि युरोपीय लोकांनी त्यांचे इतिहास शोधून काढल्यावर आम्हांला आमच्या वडिलांची ओळख पटावी ही स्थिति मोठी भूषणावह नाही; आणि दुसरें म्हणजे ब्रिटिशांच्या पूर्वीच्या सात-आठशे वर्षांचा इतिहास आगरकर म्हणतात तसाच आहे. जीवरक्षणापलीकडे आम्ही कांही करूं शकलो नाही. विद्या नाही, कला नाही, संशोधन नाही, महाकाव्य नाही, व्याकरण नाही, कोश नाही, समाजरचनेचीं नवीन तत्त्वें नाहीत, शासनाच्या नव्या कल्पना नाहीत. शिलावस्था म्हणजे दुसरें काय असतें?
 'सामाजिक घडामोड' या निबंधांत राजकीय जीवनाविषयी हेच विचार आगरकरांनी मांडले आहेत आणि "आज (त्यांच्या काळीं) आम्ही पूर्ण हतबल झालों आहों, परावलंबी झालों आहों, प्रतिकारशून्य झालों आहों, याचें कारण म्हणजे आमची ती राजभक्तीच होय," असें सांगितलें आहे. ज्या त्या गोष्टींत राजाच्या तोंडाकडे पाहण्याची आम्हांस खोड! लोकशिक्षण असो, व्यापारवृद्धि असो, यांत्रिक शोध असो, मादक द्रव्यनिषेध असो, सामान्य नीतिप्रसार असो- काय पाहिजे तें असो, अगदी शुष्क गोष्टींपासून मोठ्या महत्त्वाच्या गोष्टींपर्यंत सरकारपुढे तोंड वेंगाडल्याशिवाय आमचे हातून कांहीएक होणार नाही; असा आमचा पक्का ग्रह होऊन बसला आहे. कांही अंशी ही स्थिति अपरिहार्य आहे. पारतंत्र्यांत शतकेंच्या शतकें ज्यांचीं गेलीं आहेत त्यांना स्वातंत्र्याचा बाऊ वाटावयाचा; आणि पारतंत्र्यच सुखावह् वाटावयाचें!
गुणलोप
 अशा प्रकारे हिंदु समाजाला जी शिलावस्था आली होती, तिच्यामुळे त्याचें सर्व कर्तृत्व नष्ट झालें होतें. अज्ञान, अनियंत्रित व जुलमी राजसत्ता, विषमता, विपरीत धर्मकल्पना, यांमुळे राष्ट्रसंवर्धनास आवश्यक अशा सर्व गुणांचा लोप झाला होता. हिंदु लोकांत शूर वीर, मुत्सद्दी बरेच होते; पण सामान्य लोकांत