पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला । १४१

इतके सुधारलेले लोक आता अधिकच सुधारलेले असायला हवे होते; पण तसे ते नाहीत. ती सुधारणाहि राहिली नाहीं व तें वैभवहि नष्ट झालें. देशाभिमान्यांची ही नवी जात केवळ बढाईखोर आहे; त्यामुळे त्यांना स्वदोष दिसेनासे होतात व सुधारण्याची इच्छाच होत नाही; याचा आगरकरांना विशेष राग येत असे.
 आमची जुनी संस्कृति, आमचें धर्मशास्त्र, आमचें गणित, आमचें तत्त्वज्ञान हें निर्दोष व श्रेष्ठ होतें, असें म्हणून पूर्वजांचें नुसतें: गुणगान करीत राहणें हें बहुभाष विधवेसारखें आहे, असें सांगून आगरकर पुढे म्हणतात, "पराक्रमी पतीच्या निधनामुळे नवीन संतानाची आशा खुंटलेली ती गतभर्तृका ज्याप्रमाणे असलेल्या अपत्यांनाच वारंवार दृढालिंगन देऊन 'आमचे पुरुष असे होते, आमच्या पुरुषांनी असें केलें, तसें केलें' अशा प्रकारचे गुणानुवाद गाण्यांतच समाधान मानून घेते व आपल्या जीविताची कृतार्थता समजते, त्याप्रमाणे जुन्या थोर पुरुषांचे गुण गाण्यांतच आमच्या पुरुषार्थाची परमावधि होऊन बसली आहे."
 सुशिक्षित लोकांत आगरकरांना असा एक वर्ग आढळला की, ज्यांना पाश्चात्य सुधारणेचे नवे विचार पटत होते, पण ते समाजांत प्रसृत करण्याची त्यांची तयारी नव्हती. समाजाचे दोष दाखविण्याला त्यांचा विरोध अशासाठी होता की, अशिक्षित लोकांपुढे अशा प्रकारचा बुद्धिवाद मांडल्याने त्यांचा बुद्धिभेद होऊन, समाजांत अनवस्था उत्पन्न होईल. या आक्षेपांत बराच अर्थ आहे हें मान्य करूनहि, आगरकरांनी म्हटले आहे की, "संक्रमणकाळांत तसे होणे अपरिहार्य असते; आणि दुसरें असें की, सुधारकांनी खूप उपदेश केला तरी लोक लगेच तसें वागूं लागतील, असा संभव नसतो. समाजाची सुधारणा मुंगीच्या गतीने होत असते. नवीन विचार लोकांना सांगणे हैं सुशिक्षित लोकांचे कर्तव्यच आहे. त्यावांचून तरणोपाय नाही."
 सुशिक्षित लोकांत असे कांही जण होते की, ज्यांना नवीन विचार पटले असले तरी, ते लोकांत प्रसृत करण्याचें धैर्य त्यांच्या अंगीं नव्हतें. आगरकरांच्या मतें हा आमचा राष्ट्रीय दोषच आहे. "आमच्या पंडितांना लोकापवादाचें भय फार असल्यामुळे ते पांडित्य-प्रदर्शनापलीकडे सहसा जात नाहीत; त्यांना आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करण्याची उत्कट इच्छा किंवा धैर्य होत नाही," असें सांगून आगरकरांनी भास्कराचार्यांचें उदाहरण दिलें आहे. ग्रहणें कशी लागतात याचें खरें ज्ञान त्यांना असूनहि ते स्नान, दान, मंत्र जप इत्यादि मूर्खपणाचे आचार सोडूं शकले नाहीत. 'आमचें ग्रहण सुटलें नाही' या लेखांत शेवटी त्यांनी म्हटलें आहे, "लोकापवादाचें भय टाकून, आपल्या मनास शुद्ध दिसेल तें लोकांस सांगण्याचे व तदनुसार वागण्याचे धैर्य केलें पाहिजे; आणि तसें पुष्कळांकडून होऊं लागले तरच अज्ञान-राहूने ग्रासलेल्या आमच्या या हतभाग्य देशाचे ग्रहण लवकर सुटणार आहे."
 "लोकमान्य टिळकांची मतें सुधारणेस अनुकूल असूनहि केवळ सवंग लोकप्रियता व पुढारीपण मिळवण्यासाठी त्यांनी आपली मतें बाजूला ठेवून पुराणमताभि