व्यक्तिस्वातंत्र्य । १४५
व्यक्तिमात्रास (पुरुषास व स्त्रीस) जितक्या स्वातंत्र्यांचा उपभोग घेतां येईल तितका घ्यावयाचा हें अर्वाचीन पाश्चात्त्य सुधारणेचें मुख्य तत्त्व आहे." आपल्या सर्वं लेखनांत आगरकरांनी याच तत्त्वाचा तळमळीने पुरस्कार केला आहे. किंबहुना व्यक्तिस्वातंत्र्याचा उद्घोष करणें हेंच त्यांचें जीवितकार्य होय, असेंहि म्हणतां येईल.
पाश्चात्त्य सुधारणांचा स्वीकार
पाश्चिमात्य विद्येच्या प्रसारामुळे समाजाची शिलावस्था हळूहळू बदलूं लागली; कारण नवीन विचारांचें वारें समाजांत खेळू लागलें. नवीन शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य सुधारणांचा अंगीकार आपण केला तरच व्यक्तिस्वातंत्र्याची स्थापना होऊं शकेल व मग समाजाची उन्नति होईल, असें त्यांनी प्रतिपादिले आहे; आणि म्हणूनच ज्या तत्त्वांच्या अनुरोधाने समाजांत सुधारणा घडवून आणायची त्या नवीन तत्त्वांचें विवेचन त्यांनी आपल्या लेखांत केलें आहे. पाश्चिमात्य शिक्षणांत मनुष्य- सुधारणेच्या अत्यावश्यक तत्त्वांचा समावेश झालेला आहे, म्हणून ज्या लोकांस लयास जावयाचें नसेल त्यांनी त्यांचे अवलंबन केलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पाश्चात्त्य विद्येला आगरकरांनी दुर्बिणीची उपमा दिली आहे ती अगदी सार्थ आहे. ते म्हणतात, "ज्याला दुर्बिणीचें किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राचें साहाय्य आहे, त्याला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात, त्या ज्याला त्यांचें साहाय्य नाही, त्याला तितक्या स्पष्ट दिसत नाहीत; तसेच ज्याने शास्त्राभ्यास केला आहे, ज्याने इतिहास वाचला आहे, ज्याने जगाचा पुष्कळ अनुभव घेतला आहे व ज्याने विचारांत दीर्घ काळ घालविला आहे, अशा तत्त्ववेत्त्यास मनुष्य-प्रवृत्तीची दिशा जितकी नीट समजणार आहे, तितकी ती अशिक्षितास समजण्याचा संभव नाही.
पाश्चात्त्य सुधारणेचीं मूलतत्त्वें ज्यांना पटलीं आहेत, त्यांना आपल्या समाज- व्यवस्थेत अनेक दोष दिसून येतील. ते सामान्य लोकांना दाखवून देऊन, नवीन तत्त्वांचा पुरस्कार करतांना, नवीन विचारांचें प्रतिपादन निर्भयपणें केलें पाहिजे, असें आगरकरांनी सांगितलें आहे. लोकमत नवीन विचारांना प्रतिकूलच असणार; पण त्या लोकमताला भिऊन चालणार नाही. ज्यांना समाजाला नवीन वळण लावून त्याची उन्नति करण्याची इच्छा आहे त्यांनी सत्यप्रतिपादन करणें अवश्य आहे. नाही तर लोकमतांत बदल होणारच नाही. समाजधुरीणांना लोकमताचा बागुलबोवा वाटू लागला, ते लोकमताविरुद्ध जाण्यास भिऊं लागले, तर कोणत्याहि समाजाला उन्नतावस्था येणें शक्य नाही, असें त्यांनी बजावलें आहे.
आमचा राष्ट्रीय दोष
लोकापवादाचें भय वाटणें हा, आगरकरांच्या मतें आपला राष्ट्रीय दोष आहे व त्यामुळे आपलें अतिशय नुकसान झालें आहे. समाजाच्या हितास्तव ज्याला जी गोष्ट बरी वाटेल ती त्याने उघडपणें बोलून दाखवणें यांतच समाजाचें कल्याण आहे, असें त्यांनी सांगितलें आहे. ज्या कारणांमुळे आपली अधोगति झाली, तीं समाजाला
के. त्रि. १०