पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४८ । केसरीची त्रिमूर्ति

खितपत पडलें आहे. पाश्चिमात्य शिक्षणामुळे ज्या दिवशी या वादास प्रारंभ झाला तो दिवस हिंदुस्थानच्या भावी इतिहासांत महोत्सव करण्यासारखा होईल. विचारांचा कलह म्हणजे माणसांत चैतन्य निर्माण झाल्याचें द्योतक आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या निर्मितीसाठी त्याची नितान्त आवश्यकता आहे, असे त्यांचें निश्चित मत होतें.
 अशा प्रकारे व्यक्तिस्वातंत्र्याच्या स्थापनेसाठी समाजांत कोणत्या सुधारणा करणें अवश्य आहे, त्यासाठी काय केलें पाहिजे, समाजाला काय शिकवलें पाहिजे, त्याचा परिणाम काय होईल यासंबंधी मनाचा निश्चय झाल्यानंतर, आगरकरांनी स्वतःची भूमिका ठरवून त्याप्रमाणे वागण्याचा निर्धार केला होता. सत्य तेंच सांगणार ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यापायीं वाटेल ती संकटें येवोत; त्यांना तोंड देण्याची त्यांची तयारी होती. 'महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र' या लेखांत ते म्हणतात, "लोकांना आज ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या या हतभाग्य लेखकास पसंत नसल्यामुळे, लोकच्छंदानुवर्तन त्याला अशक्य झालें आहे. इतकेंच नाही, तर लोकांस अप्रिय परंतु पथ्यकर असे विचार त्यांच्या मर्जीविरुद्ध पुनः पुन्हा त्यांचे पुढे आणणें हेंच आपले कर्तव्य व जीविताचें सार्थक अशी त्याची दृढ कल्पना झाली आहे."
 समाजशिक्षणाचें हें दुर्घट कार्य आगरकरांनी स्वार्थत्यागपूर्वक चालवलें, आणि त्यामुळे जो उपहास व जे शिव्याशाप समाजाकडून त्यांना मिळाले ते त्यांनी सहन केले. पूज्य व प्रिय आप्तजनांचा रोषंहि त्यांना पत्करावा लागला. विरुद्ध पक्षाच्या लोकांनी त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची प्रेतयात्रा काढली तीहि त्यांना पाहवी लागली. पण हें सर्व त्यांनी एखाद्या स्थितप्रज्ञासारखें सोसलें. कारण आपलें सत्यप्रतिपादन केव्हा ना केव्हा तरी लोकांना पटेल व समाज त्याचा स्वीकार करील अशी त्यांना आशा वाटत होती.