पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनुष्यसुधारणेचीं मूलतत्त्वें । १५१

बदलत चालले आहे, असें सांगतांना ते म्हणतात, "या विश्वांतील कोणतीहि सचेतन किंवा अचेतन वस्तु स्थिर नाही; प्रत्येक क्षणास प्रत्येकीत दृश्य किंवा अदृश्य फेरफार होत आहेत. सध्या पृथ्वीवर जे ज्ञानी पुरुष आहेत, त्या सर्वांच्या अंतःकरणाची अलीकडे अशी खात्री होत चालली आहे की, जगाचीं स्थित्यंतरें अनादि व अनंत आहेत. तस्मात् आपणांस अनुकूल अशा स्थित्यंतरास आपण साहाय्यभूत व्हावें हे आपणांस योग्य आहे."
 आगरकरांनी मनुष्यजातीच्या स्थित्यंतरांचे धार्मिक, राजकीय व सामाजिक असे तीन विभाग कल्पून त्यांचा क्रमाने विचार केला आहे; तो आता पाहवयाचा आहे.
धार्मिक
 काम, क्रोध, लोभ, मत्सर, दया इत्यादि मानवी मनोवृत्तिः जशा नैसर्गिक आहेत, तशीच धर्मवृत्तीहि नैसर्गिक आहे. मात्र मनुष्याच्या प्राथमिक अवस्थेत ती स्पष्टपणे दिसत नाही; त्याच्या अंतःकरणांत अगदी सूक्ष्म अशा बीजरूपाने ती उत्पन्न झालेली असते. मनुष्याची अवस्था जसजशी बदलत जाते, तसतसा त्याच्या धर्मकल्पनेचा विकास हळूहळू होत जातो. निर्गुण, निराकार व सर्वगामी परमेश्वराची अत्यंत उन्नत कल्पना प्रारंभापासून मानवाच्या मनांत होती, हें खरें नाही. प्रथम तो निर्जीव वस्तु किंवा पशु यांच्या रूपाने निसर्गशक्तींची पूजा करूं लागला. मग अनेक देवता उत्पन्न झाल्या. त्या सगुण देवतांची उपासना हजारो वर्षे चालू आहे. कालांतराने अनादि, अनंत विश्वसंचालक अशा एकाच परमेश्वराची कल्पना उदित झाली. त्यानंतर द्वैत, अद्वैत इत्यादि तत्त्वज्ञान उदय पावलें. यावरून हें दिसून येईल की, वेद अनादि असून, त्यांतील सूक्तांचे द्रष्टे जे प्राचीन ऋषि त्यांना एकदम पूर्ण ज्ञान प्राप्त झालें होतें, ही समजूत अत्यंत भ्रामक आहे; तिला कसलाहि आधार नाही. अनेकत्वानंतर एकत्वाची, स्थूलानंतर सूक्ष्माची, जडानंतर चिद्रूपाची, साकारानंतर निराकाराची कल्पना मनुष्याच्या विकास पावत जाणाऱ्या बुद्धीस येणें हेंच अत्यंत स्वाभाविक आहे. पदार्थविज्ञान, रसायन, वैद्यक, न्याय इत्यादि शास्त्रांतहि उत्तरोत्तर असाच विकास होत गेला आहे. ज्याप्रमाणे जड सृष्टीच्या शास्त्रीय विचारांत गुरुत्वाकर्षण ठाम होऊन गेलें आहे, त्याप्रमाणे धर्मविचारांत सर्वशक्तिमान् व सर्वज्ञ अशा एका परमेश्वराची कल्पना दृढ होऊन गेली आहे; आणि आगरकरांच्या मतें मनुष्याला अजूनहि पूर्णावस्था आलेली नाही.
निसर्गपूजा
 रानटी अवस्थेतील मनुष्याला विश्वाचे व्यापार, पदार्थांचे धर्म, वस्तूंत होणारी नैसर्गिक रूपांतरें यांचें ज्ञान नसल्यामुळे त्याला ऊन, पाऊस, वारा, वीज, पूर वगैरे नैसर्गिक घटना आणि वाघ, सिंह इत्यादि क्रूर पशु यांची भीति वाटते. त्यांच्यापासून स्वसंरक्षण कसें करावें हें त्याला समजत नाही, म्हणून तो त्यांची पूजा