पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५४ । केसरीची त्रिमूर्ति

आचार-प्रकरण
 माणसांचा समूह एकत्र नीटपणें नांदायला हवा असेल, तर त्यांच्या वागण्यावर बंधने घालावी लागतात. परस्परांशी वागण्याची हीं जीं बंधने वा नियम त्यांनाच आचारपद्धति म्हणतात. अशा नियमांची समाजाला फारच आवश्यकता असते. त्यांच्यावांचून समाज चालावयाचा नाही. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत त्यांतील घटकांच्या अज्ञानामुळे, भीतीमुळे किंवा दुराग्रहामुळे, कार्यकारण न कळल्यामुळे अनेक प्रकारचे अंध, तर्कशून्य आचार रूढ होतात. पूर्वी युरोपांत अशा प्रकारचा आचारधर्म रूढ होता व आपल्याकडे तो अजूनहि चालू आहे; पण ज्ञानाच्या प्रसारामुळे हीं आचारबंधनें शिथिल होऊं लागतात व वेडेपणाच्या आचारांचा लोप होतो. हीच सुधारणेची दिशा होय. शास्त्रांची प्रगति झाली, कार्यकारणभाव कळूं लागला की धर्मकल्पना उन्नत होतात. बुद्धीचा विकास झाला की प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासूं लागतात, असंख्य देवतांची पूजा करणें अयोग्य वाटू लागतें, आणि सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्याचें परिपालन व नाश करणाऱ्या अशा एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो.
 ज्ञानाच्या प्रसारामुळे व बुद्धीच्या विकासामुळे आचारधर्माचें स्तोम कमी होतें, त्याचप्रमाणे नीति व सदाचार हाच खरा धर्म होय हें कळूं लागतें. अज्ञानाचा निरास करून लोकांना अशा धर्माची शिकवण द्यावी, याच हेतूने आगरकर पाश्चात्त्य सुधारणेच्या तत्त्वांची सतत चर्चा करीत होते. "त्यामुळे तुमच्या धर्माचारांत प्रचंड क्रांति होऊन तुमचें वर्तन पराकाष्ठेचें साधें व फक्त नीतीच्या नियमांनी चालणारें असें होईल; संध्या, ब्रह्मयज्ञ, श्रावण्या, श्राद्धे, वगैरे चालू धर्माचार पूर्णपणें लयास जाऊन त्यांच्या जागीं अधिक उपयुक्त व समंजसपणाचे आचार प्रचारांत येतील; आणि सत्यपरायणता, न्यायरति, परोपकृति व शहाणपणा, इत्यादि सद्गुणांची वृद्धि होऊन लोकांना आतापेक्षा शतपट अधिक सुख मिळू लागेल." असा त्यांना विश्वास वाटत होता.
 आपल्या धार्मिक संस्थांची अशी ऐतिहासिक चिकित्सा केल्यानंतर आगरकरांनी राजकीय व सामाजिक संस्थांची व आचारांचीहि चिकित्सा केली आहे; आणि या दोन्ही क्षेत्रांत मनुष्यसुधारणेचा ओघ कोणत्या दिशेने वाहत आहे तें दाखविलें आहे. या दोन्ही विषयांत बलात्काराकडून संमति तत्त्वाकडे जगाची वाटचाल होत आहे, सर्व सुधारलेले देश त्या दिशेने निघाले आहेत, असें त्यांनी प्रतिपादिले आहे.
राजकीय
 मनुष्याचा रानटीपणा कमी होऊन तो समाज बनवून राहूं लागला की त्या समाजांत राजा व प्रजा किंवा शास्ता व शासित असे दोन वर्ग उत्पन्न होतात. समाज- व्यवस्थेसाठी अशा राजसत्तेची फारच आवश्यकता असते; कारण तोवांचून समाजाचें अस्तित्वच फार काळ टिकणार नाही. रानटी लोकांचाहि एक राजा असतोच व