पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनुष्यसुधारणेची मूलतत्त्वें । १५७

 त्यानंतर आगरकरांनी पति-पत्नीसंबंधाचा विचार केला आहे. त्यांच्या मतें पाश्चिमात्य देशांतील गृहस्थिति व विवाहप्रथा अगदी निर्दोष नसली तरी, भारतीय विवाहपद्धतीपेक्षा पुष्कळ चांगली व अनुकरणीय होती. हिंदुस्थानांत पूर्वी तीन लग्नपद्धति चालू होत्या. पुरुषांनी स्त्रियांना जिंकून किंवा पळवून आणून त्यांच्याशी लग्न करणें ही एक प्रथा; बापाकडून मुली विकत घेणें ही दुसरी; व स्त्री-पुरुषांनी एकमेकांना पसंत करून लग्न करणें ही तिसरी होय. पहिली प्रथा आदिवासी लोकांत अजूनहि थोडीबहुत आढळते. दुसरी पद्धत देशांत सर्वत्र चालू आहे. तिसरी मात्र आज अनेक शतके आपल्याकडे चालू नाही. वधूला वर व वराला वधू पसंत पडून त्यांचा विवाह होणें हा प्रशस्त प्रकार केवळ पुराणांत व संस्कृत नाटकांत वाचायला मिळतो. पूर्वी स्वयंवराची चाल होती, पण ती आता मुळीच रूढ नाही. पूर्वी केव्हा तरी एका स्त्रीने अनेक पति करण्याची चालू होती, असें द्रौपदीच्या उदाहरणावरून दिसतें. बहुभार्यात्व तर या देशांत अजूनपर्यंत चालू आहे. यावरून आमच्याकडे स्त्री- पुरुषसंबंध बलात्कार-तत्त्वावर चालत होते हे सिद्ध होतें. संमति तत्त्वास अनुसरून विवाह होऊ लागले म्हणजे एकपत्नीकत्वच स्थापित झालें पाहिजे. बालविवाहाची प्रथा म्हणजे लहान मुलामुलींचा विक्रय करण्याचा हक्क आईबापांना असतो याचेंच चिन्ह होय. विषमविवाह, स्त्रीचें दास्य, इत्यादि गोष्टी अत्यंत शोचनीय असून, त्यांत बलात्काराचा पुष्कळ भाग आहे. पाश्चात्त्य लोकांत ज्याप्रमाणे परस्परांच्या संमतीने विवाह होतात व एकपत्नीकत्व रूढ झालें आहे, तसें आपल्याकडे व्हायला हवें. आणि नवीन शिक्षणामुळे बलात्कारतत्त्व मागे पडून त्या जागीं संमति तत्त्व स्थापित होईल अशीं चिन्हें आगरकरांना दिसूं लागलीं होतीं.
 त्यानंतर आगरकरांनी कुटुंबसंस्थेचा विचार केला आहे. भारतांत प्राचीन काळी श्रेष्ठायत्त कुटुंब पद्धति प्रचलित होती. त्या पद्धतींत कुलपतीचा म्हणजे कुटुंबप्रमुखाचा अधिकार फार मोठा असे. कुटुंबांतील सर्व माणसांवर त्याची अनिर्बंध सत्ता चालत असे. त्यांतील कोणीहि मिळविलेल्या धनाची व्यवस्था करण्याचा अधिकार त्याला होता; कोणालाहि तो हवी ती शिक्षा करूं शकत असे. म्हणजे कुटुंब-व्यवस्था बलात्कार-तत्त्वाने चालत होती.
 अशा प्रकारची श्रेष्ठायत्त कुटुंब व्यवस्था आर्य लोकांत सुरू होण्यापूर्वी त्यांची अवस्था पारध करून जगणाऱ्या वनचरांप्रमाणे असली पाहिजे. तशा अवस्थेत आयुष्य कंठणाऱ्या लोकांत श्रेष्ठायत्त कुटुंब पद्धतिहि आढळत नाही. ते लोक पशुपालन करूं लागले म्हणजे मग ती पद्धति त्यांच्यांत सुरू होते. पाळलेल्या गुरांची जोपासना संरक्षण, गवतचाऱ्याची व्यवस्था, दूधदुभतें वगैरे कामें कुटुंबांतील निरनिराळ्या माणसांकडे सोपविलेलीं असतात; आणि तीं नीटपणे करून घेण्यासाठी मुख्य माणसाला सर्वांवर अधिकार गाजवावा लागतो. इतर कुटुंबांशी भांडण व मारामारी करण्याचा प्रसंग आला तर तोच पुढाकार घेतो. पुढे तेच लोक शेती करूं लागले तरी