पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-४-

सुधारणा - अग्रक्रम व मार्ग


 मानवी समाजांत सर्वच क्षेत्रांत स्थित्यंतर झालें पाहिजे, त्यावांचून समाजाची उन्नति होणार नाही, असा सिद्धान्त सांगून आगरकरांनी त्या स्थित्यंतराची मूलतत्त्वें कोणती यांची सविस्तर चर्चा केली; तिचा परामर्श आपण मागील प्रकरणांत घेतला. आता सुधारणांच्या अग्रक्रमाविषयी त्यांचीं काय मतें होतीं याची चर्चा करावयाची आहे.
सर्वांगीण सुधारणा
 पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे भारतांत मन्वंतर कसें झालें तें आपण मागे पाहिलें आहे. राजा राममोहन राय, लोकहितवादी, रानडे, वगैरे सुधारणावादी पुरुषांनी तें घडवून आणले. त्यांनी सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार केला होता. केवळ सामाजिक व धार्मिक सुधारणा होऊन भागणार नाही, राजकीय व आर्थिक सुधारणाहि व्हायला हव्या, असें त्यांनी प्रतिपादिले आहे. लोकहितवादींनी तर एका पत्रांत हिंदी पार्लमेंटची स्थापना करावी असे सुचविलें आहे. गेल्या शतकांत स्थापन झालेल्यां 'बाँबे असोसिएशन', 'ब्रिटिश इंडिया असोसिएशन', 'मद्रास नेटिव्ह असोसिएशन' इत्यादि संस्था राजकीय सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठीच होत्या.
 तथापि त्या सुधारणावादांत राजकीय सुधारणेला दुय्यम स्थान होतें, तिचें स्वरूप प्राथमिक होतें. तिच्या पुरस्कर्त्यांच्या मनांत स्वराज्याची कल्पनाहि नव्हती. इंग्रजी राज्य म्हणजे परमेश्वरी योजनाच आहे, असें त्यांना वाटत होते. त्यांतच समाजाचें कल्याण होईल अशी त्यांची अपेक्षा होती आणि म्हणून त्यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांवर विशेष भर दिला. त्या सुधारणासुद्धा इंग्रजांकडूनच घ्यायच्या, त्यांचेच अनुकरण करून समाजाला नवें वळण लावायचे, असाचे सुधारणावाद्यांचा